गडहिंग्लजच्या रिशेलची वायुदलात निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजच्या रिशेलची 
वायुदलात निवड
गडहिंग्लजच्या रिशेलची वायुदलात निवड

गडहिंग्लजच्या रिशेलची वायुदलात निवड

sakal_logo
By

फोटो ७०३९६ : रिशेल बारदेस्कर

गडहिंग्लजच्या रिशेलची
वायुदलात निवड
मुलींमध्ये देशात सहावी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : आजोबा आणि काकांकडून देशसेवेचे धडे गिरवलेल्या येथील रिशेल अमन बारदेस्कर हिने वायुदलात सेवा बजावण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. एनडीएसाठी झालेल्या विविध परीक्षेत ती राष्ट्रीय पातळीवर ३३ वी आली. मुलींमध्ये सहावी, तर वायुदलाच्या गुणवत्ता यादीत तिसरी आली. दरम्यान, पुढील आठवड्यात पुण्याच्या खडकवासला येथे ती प्रशिक्षणासाठी हजर होणार आहे. वायुदलात निवड होणारी रिशेल ही गडहिंग्लजमधील पहिलीच आहे.
तिचे वडील अमन अबुधाबीमध्ये गॅस व ऑईलच्या सरकारी कंपनीत नोकरीस आहेत. रिशेलने अबुधाबीमध्ये आठवीपर्यंत, तर बारावीपर्यंतचे शिक्षण संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये पूर्ण केले. याच वर्षी एप्रिलमध्ये तिने एनडीएसाठीची परीक्षा दिली. देशातून ६ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले, तरी त्यापुढील सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, पायलट अ‍ॅट्युटूड बॅटरी ट्रेनिंग व वैद्यकीय अशा तीन खडतर परीक्षा असतात. ती त्यातही जिद्दीने यशस्वी झाली. त्यानंतर देशभरातून ४०० उमेदवारांची गुणवत्ता यादी यूपीएससीने प्रसिद्ध केली. त्यात तिचा समावेश आहे. वायुदलात निवड झालेल्या देशातील सहा महिलांपैकी महाराष्ट्रातील ती एकमेव आहे. पुणे येथील खडकवासला एनडीए अ‍ॅकॅडमीत तीन वर्षांचे, तर डुंडीगलच्या एअरफोर्स अॅकॅडमीत एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ती प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहे.
रिशेलचे आजोबा बस्तू बारदेस्कर भारतीय सैन्य दलात होते. काका जीवन बारदेस्कर लेफ्टनंट कर्नल आहेत. बारदेस्कर कुटुंबीयांचा देशसेवेचा वसा आता रिशेल पुढे चालविणार आहे. या निवडीने गडहिंग्लजच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. एनडीएसाठी पूर्वी केवळ पुरुष उमेदवारांनाच संधी दिली जायची. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गतवर्षीपासूनच १९ मुलींना संधी दिली जात आहे. यावर्षीच्या मुलींच्या दुसऱ्‍या, तर एनडीएच्या १४९ व्या बॅचमधून रिशेलची निवड झाली आहे. तिला वडील अमन, आई प्रतिभा, काका लेफ्टनंट कर्नल जीवन यांचे प्रोत्साहन मिळाले.