फुटबॉल हंगाम लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल हंगाम लांबणीवर
फुटबॉल हंगाम लांबणीवर

फुटबॉल हंगाम लांबणीवर

sakal_logo
By

विद्यापीठ स्पर्धेमुळे फुटबॉल हंगाम लांबणीवर
केएसएच्या बैठकीत निर्णय; खेळाडूंमध्ये नाराजी, संघांचा खर्च वाढणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. संतोष ट्रॉफीसाठीची निवड चाचणी आणि आंतरविद्यापीठ स्पर्धा यामुळे कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनने हा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवारी (ता. २३) होणारे फुटबॉल सामने होणार नाहीत. केएसएच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे फुटबॉल संघ आणि खेळाडू नाराज झाले. केएसएचा निर्णय नियमबाह्य असल्याचा आरोप खंडोबा तालमीने केला आहे. सोशल मीडियावरूनही या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा शुक्रवार (ता. २३) पासून सुरू होणार होती. दोन वर्षांच्या खंडानंतर परदेशी खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार होता. त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. मात्र स्थानिक संघातील काही खेळाडू संतोष ट्रॉफीच्या निवड चाचणीसाठी गेले आहेत. तर काही खेळाडू विद्यापीठ संघातून आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी गेले आहेत. त्यामुळे फुटबॉल हंगाम पुढे ढकलला आहे. याबाबतचा निर्णय आज केएसएच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला सरचिटणीस माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, विश्वंभर मालेकर, प्रा. अमर सासणे, मनोज जाधव, प्रदीप साळोखेंसह १५ संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------
नियमबाह्य निर्णय
‘केएसए’च्या निर्णयाला खंडोबा तालीम फुटबॉल संघाने विरोध केला. केएसए लीग नियम क्रमांक २० नुसार शिवाजी विद्यापीठ संघातून फुटबॉल स्पर्धेसाठी जर ‘ए’ डिव्हिजन संघातील कमीतकमी ४ किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडूंची निवड झाली असले व संबंधित संघाने लेखी पत्रानुसार ही बाब कळवली असेल तर सामना पुढे जाऊ शकतो. मात्र सध्या संघातील ४ पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेसाठी गेलेले नाहीत. निवड चाचणीसाठी गेल्यास सामना पुढे ढकलता येत नाही. त्यामुळे हा निर्णय नियमबाह्य आहे, अशी भूमिका खंडोबा तालमीची आहे. काही संघांनी सोशल मीडियावरून निषेधाचे स्टेटस लावून नाराजी व्यक्त केली.
---------------------------------------------------------
खर्च वाढणार...
बहुतांशी संघांनी परदेशी खेळाडू आणले आहेत. त्यांच्या राहण्याचा खर्च जास्त असतो. लीग पुढे गेल्याने संघांचा हा खर्च वाढणार आहे. लोकवर्गणीतून हा खर्च केला जातो. त्यामुळे तालीम संघांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.