
रंकाळा बैठक
70528
रंकाळ्यातील कॉंक्रीटीकरण थांबवले
शहर अभियंता सरनोबत ; प्रहार प्रतिष्ठानसोबतच्या बैठकीत निर्णय; आज संयुक्त पाहणी
कोल्हापूर, ता. २३ ः रंकाळा तलावात सुरू असलेले कॉंक्रीटीकरणाचे काम थांबवण्यात येत आहे. तसेच सांडपाणी मिसळणाऱ्या, नवीन सुचवलेल्या कामांच्या ठिकाणी उद्याच संयुक्त पाहणी केली जाईल. प्रस्तावित कामांना हेरिटेज समिती व जैवविविधता समितीची मंजुरी घेतली जाईल, असे महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी स्पष्ट केले.
प्रहार प्रतिष्ठानसोबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगररचनाचे सहाय्यक संचालक, ड्रेनेज विभागाचे आर. के. पाटील यांच्यासोबत आज महापालिकेत बैठक झाली. अतिरिक्त आयुक्तांसोबत यापूर्वी झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे त्यांच्या बैठकीत निषेध व्यक्त करून प्रतिष्ठानचे रंकाळाप्रेमी बाहेर पडले. त्यानंतर तातडीने प्रशासकांसोबत बैठक घेण्यात आली. दोन तास विविध विषयांवर चर्चा झाली.
चंद्रकांत यादव म्हणाले, ‘‘रंकाळा हा राजर्षी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे. ते जैसे थे ठेवावे. सुशोभीकरणाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न आहे. कॉंक्रीटीकरण त्वरीत थांबवा. वाहनतळ उभा करण्यासाठी जलसंपदाची ४० गुंठे जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. निधी योग्य कामासाठी वापरला जावा. ’’ आनंदराव चौगले म्हणाले, ‘‘ चुकीच्या कामावर खर्च केला जाणारा पैसा रोखण्यासाठी आम्ही पाऊल टाकले आहे. योग्य कामांवर तो खर्च केला जावा. रंकाळ्यात शेजारील नाल्यांतून होत असलेले प्रदूषण रोखणे, संरक्षक भिंत मजबूत करणे, टॉवर तसेच धुण्याची चावी परिसराचे संवर्धन करणे गरजेचे आहे.’’
अमर जाधव, विश्वास पोवार यांनी आता सुरू असलेले काम नेमके कशाचे आहे, कुणाच्या मागणीप्रमाणे केले जात आहे समजत नाही असे सांगितले. विकास जाधव यांनी जुनी बांधकामे दुरूस्त न करता सुशोभीकरणावर पैसा खर्च केला जात आहे असे सांगितले. ॲड. शशांक चव्हाण यांनी रंकाळा तलाव इकोसेन्सेटिव्ह झोन जाहीर करावा. त्यातील जैवविविधतेची माहिती देणारे फलक परिसरात उभे करावेत. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून अभ्यास गट नेमून अभ्यास केला जावा. यातून रंकाळ्याचे महत्व समजेल व तो जपला जाईल असे सांगितले. तांबट कमानीजवळील ऐतिहासिक झाडाचे संरक्षण करण्याची मागणी रवींद्र चव्हाण यांनी केली. प्रवीण पोवार, ॲड. अजित चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.
चौकट
धुण्याची चावी सुरू करणार
धुण्याच्या चाव्या सुरू केल्या तर कपडे धुणाऱ्यांची सोय होऊन रंकाळ्यातील प्रदूषण कमी होईल असे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. चार कोटींच्या निधीपैकी आलेल्या निधीतून तातडीने चाव्या सुरू करण्यात येणार असल्याचे सरनोबत यांनी सांगितले.
चौकट
बैठकीतील निर्णय
-परताळा येथे टाकलेल्या कचऱ्याचा त्वरीत उठाव
-तिथे कचरा टाकू नये यासाठी तारेचे कुंपण
-शांतता झोनमध्ये फलक लावले जाणार
-अवजड वाहतूक रोखली जाणार