गुन्हेगारी वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हेगारी वृत्त
गुन्हेगारी वृत्त

गुन्हेगारी वृत्त

sakal_logo
By

बावड्यात ट्रॅक्टर नेण्यावरून मारहाण
---
भाऊ, वडिलांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः माझा ट्रॅक्टर का नेलास, असे विचारल्याच्या रागातून अजित शिवाजी कदम (वय ३९, रा. उलपे गल्ली, कसबा बावडा) यांना त्यांचे भाऊ आणि वडील यांनी मारहाण केली. यात ते जखमी झाले. या प्रकरणी विजय शिवाजी कदम (३७), शिवाजी गणपती कदम (६४, दोघे रा. उलपे गल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित यांचा ट्रॅक्टर त्यांचे भाऊ विजय आणि वडील शिवाजी घेऊन जाणार होते. या वेळी अजित यांनी त्यांना थांबविले. ‘माझा ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका. मागच्या वेळी तुम्ही ट्रॅक्टर नेला आणि सगळे डिझेल संपविले,’ असे ते म्हणाले. याचा राग आल्याने विजय याने गोठ्यातील खुरपे आणले आणि तो अजित यांच्या अंगावर धावून गेला. या वेळी झालेल्या मारहाणीत अजित यांच्या डोळ्याच्या वर आणि डोक्यात खुरपे लागले. त्यामुळे ते जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------

भांडण मिटविणाऱ्या तरुणाला मारहाण
कोल्हापूर ः दोघांचे भांडण मिटविण्यास गेलेल्या गणेश महादेव कांबळे (वय ३५, रा. आंबेडकरनगर, कसबा बावडा) याला स्टंपने मारहाण झाली. या प्रकरणी सूरज बाळकृष्ण कांबळे (रा. आंबेडकरनगर, कसबा बावडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा बावड्यातील आंबेडकरनगर चौकात गणेश, त्याचे चुलते बळिराम कांबळे आणि सूरज असे तिघे उभे होते. या वेळी बळिराम आणि सूरज यांच्यात वाद झाला. त्या वेळी गणेश हा वाद मिटविण्यासाठी पुढे गेला. त्या वेळी सूरज याने स्टंपने गणेशला मारहाण केली. यात गणेश जखमी झाला.
-----

पूर्ववैमनस्यातून कोगेत
वडिलांसह मुलाला मारहाण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः पूर्ववैमनस्यातून कोगे (ता. करवीर) येथे वडील आणि मुलाला काठीने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात परस्परविरोधी फिर्याद दिल्याने वडील आणि मुलावरही गुन्हा दाखल झाला. काल (ता. २२) दुपारी ही घटना घडली. करवीर पोलिसांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाराम तुकाराम पाटील (६०, रा. कोगे) व त्यांचा मुलगा शुभम हे त्यांच्या घराजवळ उभे होते. या वेळी पूर्ववैमनस्यातून सर्जेराव शंकर पाटील, संभाजी शंकर पाटील, प्रकाश सखाराम पाटील, सुजित संभाजी पाटील (सर्व रा.कोगे) यांनी त्या दोघांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. त्यामुळे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात सुजित पाटील यांनी विरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजित यांचे वडील संभाजी पाटील हे औषध आणण्यासाठी गेले असताना पूर्ववैमनस्यातून आकाराम पाटील आणि त्यांचा मुलगा शुभम यांनी संभाजी यांना काठीने मारहाण केली. या फिर्यादीवरून आकाराम पाटील आणि शुभम यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------

शहरात दोन दुचाकी चोरीला
कोल्हापूर ः शहरात व्हीनस कॉर्नर आणि रंकाळा मुख्य प्रवेशद्वार येथून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. याबाबत शाहूपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन रंगराव पाटील (वय २०, रा. नंदवाळ, ता. करवीर) यांनी एमएच १० एटी ४७४४ ही दुचाकी व्हीनस कॉर्नरजवळील एका हॉटेलसमोर उभी केली होती. अज्ञाताने ही दुचाकी पळवली. या प्रकरणी रोहन यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशीच दुसरी घटना रंकाळ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. येथे लावण्यात आलेली एमएच ०९ सीजी ८८११ ही दुचाकी चोरट्याने पळवली. याबाबतची फिर्याद मारुती सर्जेराव पाटील (वय ३२, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे.