
विमानतळ विस्तारीकरण
हिस्सेदारांनी संमतिपत्रे
डिसेंबरअखेर द्यावीत
उपविभागीय अधिकारी नावडकर : विमानतळ विस्तारीकरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पाची निकड व शासनाकडून होणारा पाठपुरावा लक्षात घेता डिसेंबरअखेर ज्या जमिनीमधील सर्व सह हिस्सेदारांचे लेखी संमतीपत्र मिळेल व ज्या मिळकतीवर कोणतीही अडचण नाही, कोणत्याही न्यायालयात किंवा आपसात वाद नसेल, अशाच जमिनीची खरेदी केली जाणार आहे. ज्या खातेदारांनी अद्याप लेखी संमती दिलेली नाही, त्यांनी करवीर प्रांताधिकारी यांच्याकडे डिसेंबरअखेर द्यावी. नसेल तर पुढील भू संपादनाची कार्यवाही भूमी संपादन अधिनियमानुसार होईल, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.
नावडकर म्हणाले, ‘कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी मौजे तामगाव येथील ०.३४.७५ हेक्टर आर चौ. मी., मौजे मुडशिंगी येथील एकूण क्षेत्र २५.६०.८३ हेक्टर आर. चौ. मी., अतिरिक्त वाढीव जमीन ०.२९.६९ हेक्टर आर. चौ. मी. असे एकूण २५.९०.४९ हेक्टर आर. चौ. मी. क्षेत्र थेट खरेदीने घेण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी २१२ कोटी २५ लाख २५ हजार ६६ कोटी रुपये मंजूर आहेत. मौजे तामगावमधील प्रस्तावित जमीन ०.३४.७५ हे. आर. चौ. मी. पैकी ०.२८.७५ हे. आर. चौ. मी. जुलै २०२२ मध्ये खरेदी केली आहे. उर्वरित ०.०६.०० हे. आर. चौ. मी. जमीन ही भूमी संपादन कायदा २०१३ नुसार संपादन करण्यासाठी पायाभूत प्रकल्प असल्यामुळे शासनाने सवलत दिली आहे. उर्वरित ०.०६ हे. आर. जमीन सन २०१३ च्या भूमी संपादन कायद्यान्वये पुढील ६ महिन्यांत संपादित केली जाणार आहे.
मौजे मुडशिंगी येथील एकूण क्षेत्र २५.९०.४९ हे. आर. चौ. मी. पैकी दिनांक २३ डिसेंबर २०२२ अखेर एकूण ९.१८.१२ हे.आर.चौ.मी. जमीन खरेदी केली आहे. मात्र, आता काही सातबारांवर अनेक खातेदारांची नावे असून, त्यापैकी काही खातेदारांची संमती मिळालेली नाही. इतर खातेदारांची संमती प्राप्त न झाल्यामुळे खरेदीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. काही गट नंबरमध्ये संमती मिळूनही न्यायिक वाद असल्याने हे गट खरेदी करता येत नाहीत. त्याचबरोबर काही जमीन मालकांनी अद्याप संमती दिली नसल्यामुळे त्यांची जमीन खरेदी करता येत नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.