प्रदत्त मतदान नावालाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदत्त मतदान नावालाच!
प्रदत्त मतदान नावालाच!

प्रदत्त मतदान नावालाच!

sakal_logo
By

प्रदत्त मतदान नावालाच!
मतदाराचे केवळ समाधान; मताची होत नाही मोजणी
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : मत हे अनमोल असते. त्याची कशातच मोजदाद होऊ शकत नाही. मात्र, तुमचे मत मोजलेच जात नसेल तर? प्रदत्त मतदानाबाबत (टेंडर व्होट) असेच होत आहे. आधीच कोणीतरी बोगस मतदान केल्यामुळे मतदाराला प्रदत्त मतदानाचा पर्याय दिला जातो. पण, यातून केवळ मतदाराचे समाधान होत आहे. प्रत्यक्षात त्याच्या मताची मोजणीच केली जात नाही. मग, प्रदत्त मतदानाचे सोपस्कार कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
निवडणूक कोणतीही असो, प्रत्येक मताला महत्त्व असते. त्यामुळे उमेदवार आणि त्याच्या समर्थकांकडून प्रत्येक मतासाठी धडपड केली जाते. त्यांच्याकडून अनेकदा गैरमार्गांचाही अवलंब होतो. मतदार यादीतील मतदार एक आणि त्याच्या नावावर दुसरीच व्यक्ती मतदान करते. मात्र, खरा मतदार जेव्हा मतदानासाठी येतो त्यावेळी हा प्रकार लक्षात येतो. अशा वेळी प्रदत्त मतदानाचा मार्ग स्वीकारला जातो. खातरजमा करून संबंधित मतदाराला मतदानाची परवानगी दिली जाते; पण त्याला मतदान यंत्राऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करावे लागते. त्यानंतर ते सील करून ठेवले जाते.
मात्र, मतमोजणीच्या प्रक्रियेत या प्रदत्त मतदानाची मोजणी होत नाही. केवळ मतदान यंत्रातील मतांचीच मोजणी केली जाते. कारण, प्रदत्त मतदान मोजले, तर एकूण मतदानापेक्षा तो अधिकचा आकडा होता. मतदानच मोजले जात नसेल तर, प्रदत्त मतदान करुन तरी काय उपयोग हा खरा प्रश्‍न आहे. मतदाराला केवळ मतदान केल्याचेच समाधान या साऱ्या प्रक्रियेतून मिळत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही असेच घडले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
------------
चौकट
खात्री पटल्यावरच मतदान, मग...
वास्तविक एखाद्या व्यक्तीने मतदान केले आणि त्यानंतर त्याच नावावर पुन्हा मतदानासाठी दुसरी व्यक्ती आली, तर प्रदत्त मतदान घेण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत दुसऱ्या वेळी आलेल्या मतदाराची मतदान केंद्रावरील नियुक्त कर्मचारी, उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी खात्री करून घेतात. त्यानंतरच त्याला मतदान करण्यास परवानगी दिली जाते, असे असेल तर मग त्याच्या मताची मोजणी न करणे म्हणजे त्याचा अधिकार हिरावून घेण्यातलाच प्रकार आहे.