नवोदयच्या धर्तीवर ''मेन राजाराम''चा विकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवोदयच्या धर्तीवर ''मेन राजाराम''चा विकास
नवोदयच्या धर्तीवर ''मेन राजाराम''चा विकास

नवोदयच्या धर्तीवर ''मेन राजाराम''चा विकास

sakal_logo
By

लोगो - लक्ष आहे ‘सकाळ’चे
फोटो - दीपक केसरकर

‘मेन राजाराम’ ‘मॉडेल’ शाळा करणार
पालकमंत्र्यांची घोषणा; ‘नवोदय’प्रमाणे विकासासाठी आराखड्याच्याही सूचना

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २४ : भवानी मंडप येथील मेन राजाराम हायस्‍कूलचा समावेश मॉडेल शाळांमध्ये केला जाईल. त्याद्वारे मोठा निधी दिला जाईल. त्याचवेळी या शाळेचा विकास नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली.
ते म्हणाले, ‘‘मेन राजाराम’ जिल्ह्यातील एक सर्वोत्कृष्ट शाळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या शाळेला जिल्‍ह्याचा दर्जा दिला जाणार आहे. जिल्‍ह्यातील हुशार मुले या ठिकाणी आणून निवासी शाळेची व्यवस्‍था करण्यात येईल. स्‍वातंत्र्याच्या अमृतमहोत्‍सवाचे औचित्य साधून राज्यातील ५० शाळांना मोठा निधी दिला जाईल. यात ‘मेन राजाराम’चा समावेश आहे.’’
अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास करणे, येणाऱ्या‍ भाविकांची व्यवस्था यासाठी भवानी मंडपातील सर्व शासकीय इमारती प्रशासनाच्या ताब्यात घेण्याचे प्रयत्‍न सुरू होते. याचाच एक भाग म्‍हणून मंडपातील मेन राजाराम हायस्‍कूलची इमारतही ताब्यात घेण्याचा प्रयत्‍न झाला. एक मोठी ऐतिहासिक परंपरा, वारसा असलेली शाळा स्‍थलांतर करण्यासाठी प्रयत्‍न झाले; मात्र कोल्‍हापूरकरांनी याला कडाडून विरोध केला. यासाठी आंदोलने उभारण्यात आली. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत याबाबत तक्रारी झाल्या. माजी विद्यार्थ्यांनी, तर मुख्यमंत्र्यांना दररोज शेकडो ई-मेल करून स्‍थलांतर करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री केसरकर यांनी ‘मेन राजाराम’चे स्‍थलांतर होणार नसल्याचे स्‍पष्‍ट करीत या शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले.
केसरकर जिल्‍हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्‍थित राहिले. या वेळी त्यांनी ‘मेन राजाराम’च्या विकासाबाबत संकल्‍पना मांडली. जिल्‍ह्याची प्रमुख शाळा म्‍हणून तिचा विकास करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. नवोदय स्‍कूलप्रमाणे ‘मेन राजाराम’मध्येही निवासी शाळा सुरू करता येईल, असे सांगत या शाळेसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. यासाठीचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या शाळेचा विकास करण्यासाठी प्रसंगी येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे स्‍थलांतर करावे लागले तर तेही केले जाईल. मात्र, शाळेच्या विकासात काही अडचण येणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न केले जातील, असे केसरकर यांनी स्‍पष्‍ट केले.

मालमत्ता पत्रकी नोंदीचे काय?
‘मेन राजाराम’ची इमारत जिल्‍हा परिषदेकडे ६० वर्षांपूर्वीच हस्‍तांतरित झाली आहे. या जागेचा घरफाळा व इतर बाबी जिल्‍हा परिषद पाहते. मात्र, या इमारतीची नोंद जिल्‍हा परिषदेच्या मालमत्ता पत्रकात झालेली नाही. आतापर्यंत पाच वेळा याबाबतचा प्रस्‍ताव नगर भूमापन विभागाकडे सादर केला आहे; मात्र त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. याबाबत पालकमंत्री केसरकर यांच्याकडे मागील भेटीदरम्यान विचारणा करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांनी ही नोंद करण्याची ग्‍वाही दिली होती; मात्र आजपर्यंत त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शाळेचा विकास होत असताना कागदोपत्री नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्याकडेही पालकमंत्र्यांनी पाहावे, अशी मागणी माजी विद्यार्थी व सर्वपक्षीय कृती समितीने केली.