
ग्राहक दिन कार्यक्रम
70751
ग्राहकांनी हक्काबाबत
अधिक जागरुक राहावे
संजय शिंदे ः ग्राहक दिनानिमित्त जनजागृतीपर स्टॉलचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : ‘ग्राहकांनी आपल्या हक्काविषयी अधिक जागरुक राहावे व कोणत्याही प्रकारची स्वतःची फसवणूक होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागातर्फे भवानी मंडपात जनजागृतीपर स्टॉलचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा सविता भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, वैद्य मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक आर. एन. गायकवाड, अन्न व औषध कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, अन्नधान्य वितरण अधिकारी डी. बी. सणगर, पुरवठा निरीक्षक गजानन पोवार उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘प्रत्येक नागरिक हा ग्राहक असतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करत असताना आपल्याला आपल्या हक्काविषयी जाणीव जागृती असली पाहिजे.’
‘राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना मोठे संरक्षण मिळाले असून वस्तू व सेवा खरेदी करत असताना आपल्या हक्काची जाणीव असेल तर ग्राहक हाच राजा आहे. तसेच, वस्तू व सेवा घेतल्यानंतर त्याचे पुरावे जपून ठेवले पाहिजेत’, असे मत आयोगाच्या अध्यक्षा भोसले यांनी व्यक्त केले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त केंबळकर व वैद्य मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक गायकवाड यांनी ग्राहकांच्या हक्काबाबत मार्गदर्शन केले. सरस्वती पाटील यांनी आभार मानले.