प्रोत्साहन अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रोत्साहन अनुदान
प्रोत्साहन अनुदान

प्रोत्साहन अनुदान

sakal_logo
By

प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील ५७ हजार शेतकरी ः सुमारे १७१ कोटी रुपये मिळणार

सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. २५ ः गेली अनेक दिवस प्रतीक्षा लागून राहिलेल्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी आज प्रसिद्ध केली. या यादीत जिल्ह्यातील ५७ हजार ३१० शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या खात्यावर किमान १७१ कोटी रुपये जमा होणार आहेत.
राज्य शासनाने यापूर्वीच थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीही लाभ दिला नव्हता. यावरून राज्यातील शेतकरी संघटनांसह त्यावेळी सत्तेत नसलेल्या विरोधकांकडून या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून सरकारने जास्तीत जास्त ५० हजार अनुदान देण्याची घोषणा केली होती.
शासनाने केलेल्या घोषणेनंतर जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांकडून सहकार विभागाने यादी मागवली. या यादीनुसार पात्र शेतकऱ्यांची नावे शासनाकडे पाठवण्यात आली होती. शासनाने तीन महिन्यांपूर्वी पहिली यादी प्रसिद्ध केली, त्यात जिल्ह्यातील जिल्हा बँकेकडील १ लाख २३ हजार ७६२ तर राष्ट्रीयीकृत बँकेकडील ५ हजार ५५६ शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर दुसऱ्या यादीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती.
आज शासनाने दुसरी यादी प्रसिध्द केली, त्यात जिल्हा बँकेकडील ५४ हजार ४६१ तर राष्ट्रीयीकृत बँकेकडील २ हजार ८४९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा जास्त कर्जाची परतफेड असेल तरीही ५० हजार रुपयेच या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, तर ज्यांनी ५० हजारपेक्षा कमी कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांना त्यांनी परतफेड केलेल्या कर्जाएवढी रक्कम मिळणार आहे.
.............

आधार प्रमाणिकरणानंतर पैसे
आज यादीत नाव प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांना ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या अंगठ्याचे ठसे घेतले जाणार आहेत. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर लगेच संबंधितांनी दिलेल्या बँकेच्या खात्यावर त्यांच्या अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.