नवे वर्ष समतेच्या प्रस्थापनाचे ठरावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवे वर्ष समतेच्या प्रस्थापनाचे ठरावे
नवे वर्ष समतेच्या प्रस्थापनाचे ठरावे

नवे वर्ष समतेच्या प्रस्थापनाचे ठरावे

sakal_logo
By

नवे वर्ष समतेच्या प्रस्थापनाचे ठरावे
इचलकरंजीतील चर्चासत्रातील सूर; समाजवादी प्रबोधिनीतर्फे आयोजन

इचलकरंजी, ता. २५ ः सरते वर्ष जागतिक, भारतीय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनेही राजकारण, अर्थकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रांत अनेक लक्षणीय घडामोडी घडवणारे ठरले आहे. तसेच नव्याने पुन्हा कोरोनाचे संकट उभे राहील की काय, अशी परिस्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या वर्षांमध्ये सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनेसाठी सुरू असलेल्या सामूहिक विचाराच्या जागराची व्याप्ती आणि परीघ वाढत गेला पाहिजे, असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त केले.
‘सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत’ या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चासत्रात रशिया युक्रेन युद्धापासून महाराष्ट्रातील सत्तांतरापर्यंत आणि भारत जोडो यात्रेपासून विविध राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालापर्यंत सरत्या वर्षातील अनेक गोष्टींचा आढावा घेण्यात आला. २०२३ ला सामोरे जात असताना आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीबाबतही चर्चा केली. चर्चेत प्रसाद कुलकर्णी, दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे, डी. एस. डोणे, शकील मुल्ला, महलिंग कोळेकर, रामभाऊ ठिकणे, मनोहर जोशी, आनंद जाधव, अशोक मगदूम, आनंदराव नागावकर आदींनी सहभाग घेतला.
--------
राजकारण हे सत्ताकारणाकडे
सर्व क्षेत्रीय प्रदूषण वाढत आहे आणि राजकारण हे फक्त आणि फक्त सत्ताकारण बनत चाललेले आहे. सर्वसामान्यांच्या उद्धाराची, त्यांचे जीवनमान सुधारण्याची राजकीय, आर्थिक धोरणे राबवण्यासाठी लोकचळवळ उभी राहण्यासाठी लोकजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जनतेच्या जागृतीतूनच सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध होत असते. ते करण्यासाठी कटिबद्ध राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असा संदेश सरत्यावर्षाने दिला आहे. तो ध्यानात घेऊन नव्या वर्षाची वाटचाल केली पाहिजे, असे मत या चर्चेतून पुढे आले.