
वाहनांवर कारवाई
70918
बंद अवस्थेतील वाहनांकडे
महापालिकेचे दुर्लक्षच
कोल्हापूर, ता. २५ ः महापालिकेने तीन दिवसांची नोटीस देऊन रस्त्यावरील बंद अवस्थेत उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा इशारा दिला होता. मुदत संपली तरी अनेक वाहने रस्त्यावरच आहेत. तसेच दसरा चौक व व्हीनस कॉर्नर सोडल्यास इतर वर्दळीच्या रस्त्यावरील वाहनांकडे महापालिकेचे लक्ष गेलेले नाही. वरिष्ठांनी सांगितले व कारवाई केली, असे सांगून सोपस्कार करण्यासाठीच ही कारवाई दाखवली गेल्याचे दिसते.
महापालिकेने पहिल्या टप्प्यात ३८ वाहनांना नोटीस लावल्या. त्यांची तीन दिवसांची मुदत संपली आहे. संबंधित वाहन काढले नसल्यास महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व विभागीय कार्यालयामार्फत ती जप्त केली जाणार होती. अनेक वाहने रस्ते, पूल परिसरात आहेत, असे महापालिकेनेच म्हटले होते. पण, अशा वाहनांवर कारवाई मात्र झालेली नाही.
शहरातील अनेक रस्त्यांवरून सहज चक्कर मारली तर कित्येक महिन्यांपासून जागेवर उभी असलेली शेकडोंच्या संख्येने वाहने सापडतील, अशी स्थिती आहे. अनेक वाहनांवर इतकी धूळ व कचरा बसला आहे की त्यातूनच त्याचा कालावधी सहज लक्षात येऊ शकतो. तसेच बंद अवस्थेतील वाहने सहज ओळखता येऊ शकतात. पण, वरिष्ठांनी सांगितले म्हणून काय केले हे सांगण्यासाठी ही मोहीम राबवली गेली, असेच वाटते. अशा कारवाईंमुळेच महापालिकेच्या मोहिमांकडे नागरिक गांभीर्याने पाहात नाहीत.