
सिमावाद आंदोलन
सीमाप्रश्नी आज कोल्हापुरात आंदोलन
महाराष्ट्र एकीकरण समिती : महाविकास आघाडीचा पाठिंबा
कोल्हापूर, ता. २५ : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाकडे राज्य शासन आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी उद्या (ता. २६) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सीमावासीयांची ताकद दाखवून दिली जाणार आहे. याला महाविकास आघाडीचाही जाहीर पाठिंबा असणार आहे. बेळगाव येथून सुमारे अडीच हजार आणि कोल्हापूरमधील सुमारे पाचशे ते सहाशे कार्यकर्ते या आंदोलनात सहभाग घेतील. त्यादृष्टीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाविकास आघाडीकडून नियोजन केले आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे. कर्नाटक सरकारकडून दडपशाही सुरू केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा बंद पाडला. कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी उद्याचे आंदोलन महत्त्वाचे मानले जात आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जनजागृती केली जात आहे. बेळगावसह खानापूर येथून कार्यकर्ते सकाळी कोल्हापूरसाठी रवाना होतील. उद्या बेळगाव येथे सकाळी आठला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्ते कोल्हापूरकडे येतील. तसेच महाविकास आघाडीच्या वतीने या कार्यकर्त्यांचे कागल येथील टोल नाक्यावर स्वागत केले जाईल. त्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व कायकर्ते आणि आंदोलक एकीकरण समितीसोबतच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात येतील. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दसरा चौक येथून मोर्चा काढतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी दिली.