शहराचा प्रदूषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहराचा प्रदूषण
शहराचा प्रदूषण

शहराचा प्रदूषण

sakal_logo
By

फोटो- ७१०००
.....

कोल्हापूरचा श्‍वास कोंडतोय


शहरातील हवा प्रदूषण वाढले, ‘एक्यूआय’ १५० वर, हद्दीवरील कचरा कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः धुळीचे साम्राज्य, जागोजागी पडणारा कचरा, काही ठिकाणी पेटवून दिला जाणारा प्लास्टिकचा कचरा यामुळे शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वॉलिटी इंडेक्स) ५० पर्यंत असावा लागतो; पण गेल्या दोन दिवसांपासून हे प्रमाण १५० वर पोहोचले आहे. आज हेच प्रमाण १४० वर होते. दिल्ली, मुंबईसारखी परिस्थिती येण्यापूर्वीच यावर उपाययोजनांची गरज आहे.
मध्यंतरी शहराच्या हद्दीवर टाकण्यात ग्रामीण भागातून टाकण्यात आलेल्या कचऱ्याचे सर्वेक्षण झाले; पण पुढे त्यावर काहीही झालेले नाही. हा टाकलेला कचराच पेटवून दिला जातो, त्यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त असेल, तर त्यामुळे हवेतील प्रदूषण वाढते. शहराच्या अनेक भागांतही हीच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे अनेक भागांत दोन-तीन दिवस कचराच उचलला जात नाही. हा न उचललेला कचरा पेटवून देण्यात येतो, त्याचा परिणाम हवेतील प्रदूषण वाढण्यात होतो.
मध्यंतरी, टेंबलाई टेकडी परिसरात शेजारच्या गावांतून कचरा घेऊन आलेला कंटेनर अडवला होता; पण त्यानंतर परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आर. के. नगर परिसर शैक्षणिक हब झाला आहे; पण या परिसरातही कचऱ्याचे साम्राज्य आहे, त्याच ठिकाणी विद्यार्थी उघड्यावरच नाष्टा, जेवण करतात त्यातून आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे.
शहराच्या वेशीवर गावांतून टाकण्यात आलेला बहुतांश कचरा हा पेटवला जातो. त्यात काही ठिकाणी जैव वैद्यकीय कचऱ्याचाही समावेश असतो. याशिवाय मटण, चिकन दुकानातील टाकाऊ साहित्यही या परिसरात आढळून आले आहे. या जोडीला शहरात खराब झालेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य आहे. अलीकडे वातावरणातही झालेला बदल पाहता शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक वाढला आहे. यासाठी वृक्ष लागवड करणे, कंटेनरची संख्या वाढवणे, कचऱ्याची रोज विल्हेवाट लावणे, कचरा न जाळणे हे उपाय करण्याची गरज आहे, अन्यथा शहराच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.
.....................
ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले
वातावरणातील बदल, हवेची वाढलेली घनता यामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. शहरातील अनेक फिजिशियनकडे अशा तक्रारींच्या रुग्णांची संख्या गर्दी पहायला मिळत आहे.
...........
शहरातील बदललेल्या वातावरणाबरोबरच दूषित हवेमुळे काहींना सर्दी, ताप, खोकला यांसारखी लक्षणे दिसत आहेत, यावर मास्क हाच एकमेव पर्याय आहे.
डॉ. उमेश कदम
अधीक्षक, सेवा रुग्णालय
....................
हवेचे मोजमाप
गुणवत्ता निर्देशांक *परिणाम
० ते ५० *चांगली हवा
५० ते १०० *समाधानकारक
१०१ ते २५० *प्रदूषित हवा