इचलकरंजीला पाणीटंचाईचा धसका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीला पाणीटंचाईचा धसका
इचलकरंजीला पाणीटंचाईचा धसका

इचलकरंजीला पाणीटंचाईचा धसका

sakal_logo
By

ich2516,17.jpg
71029
71030
इचलकरंजी ः शिरढोण (ता.शिरोळ) येथे जलवाहिनीला लागलेली गळती काढण्यासाठी महापालिकेची यंत्रणा गतीने कामाला लागली आहे.
--------
इचलकरंजीला पाणीटंचाईचा धसका
नियोजन कोलमडले; जलवाहिनी दुरुस्तीचे काम अपूर्णच
इचलकरंजी, ता. २५ ः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या जलवाहिनील गळतीचे काम दोन दिवसांनतरही पूर्ण झाले नाही. जलवाहिनी पूर्णतः खराब झाल्यामुळे गळती काढताना अडचणी निर्माण होत होत्या. सुरुवातीला तीन फुट असलेली गळती दुरुस्त करताना सात फुटापर्यंत पोहचली. त्यामुळे आज कृष्णा योजनेतून पाणी उपसा करण्याचे धाडस महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले नाही. परिणामी, शहरात या आठवड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिरढोण (ता. शिरोळ) येथे लक्ष्मी मंदीर नजिक जलवाहिनीला शनिवारी सकाळी मोठी गळती लागली होती. यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा बाहेर पडल्याने तेथे तळयाचे स्वरुप निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या काही घरांमध्ये पाणी शिरले होते. यातून मार्ग काढीत गळती काढण्याच्या कामाला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला जलवाहिनी तीन फुट खराब झाली होती. पण ती कालबाह्य झाल्यामुळे वेल्डींग करतांना सात फुटापर्यंत पोहचली. त्यामुळे आज दुपारपर्यंत गळतीचे काम पूर्ण होईल, असे वाटत होते. त्यामुळे सांयकाळी कृष्णा नदीतून उपसा करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
मात्र जीर्ण झालेल्या जलवाहिनीला वेल्डींग तग धरत नसल्यामुळे अडथळा निर्माण झाला. त्यामुळे आजचे नियोजन पूर्णतः कोलमडले. दिवसभर गळतीच्या ठिकाणी खड्डा खोदल्यानंतर पाणी बाहेर काढले. गळती पुन्हा निर्माण होवू नये, यासाठी उद्या सकाळी पून्हा एकदा जलवाहिनीची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतरच वेल्डींगचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे दोन दिवसानंतरही कृष्णा नदीतील पाणी उपसा झालेला नाही. केवळ पंचगंगा नदीतून पाणी उपसा करुन इचलकरंजीकरांची थोडीफार तहान भागविण्यात येत आहे. तर या आठवड्यात शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होवून तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
-----------
गळतीमुळे योजना बदनाम
शहराला कृष्णा योजनेतून बहुतांशी पाणी पुरवठा केला जातो. पण ही योजना गळकी योजना म्हणून कुप्रसिध्द आहे. या योजनेपेक्षा गळती काढण्यावरच आतापर्यंत जास्त खर्च झाला आहे. सध्या या योजनेची उर्वरीत जलवाहिनी बदलण्यासाठीचा २१ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे. त्यासाठी राजकीय पातळीवरुन सातत्यांने पाठपुरावा सुरु आहे.
-------
चार दिवसानंतर येणार पाणी
गळतीमुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. एक दिवस आड पाणी देण्याचा सुर बसत असतानाच गळतीचे संकट आले. तर गळती काढण्यास विलंब लागल्याने आता पुढील काही दिवस किमान चार दिवसानंतर पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. सध्या पंचगंगा नदीतून केवळ ९ एमएएलडी इतके पाणी उपलब्ध होत आहे. पण या नदीतील पाणी प्रदुषीत होण्याच्या मार्गावर आहे.