
अटल अचल अविचल
71008
....
‘अटल अचल, अविचल’ स्वरमयी काव्य मैफल
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे सुरेल सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी लिहिलेल्या आशयसंपन्न कवितांच्या सुरेल सादरीकरणास आज रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सृजन संपदा प्रस्तुत ‘अटल अचल, अविचल’ या स्वरमयी काव्य मैफलीत गायक-वादकांनी एकेका कवितेचा अर्थपूर्ण भाव तितक्याच संयतपणे सादर केला आणि प्रतिभासंपन्न कवीच्या कवितांतील प्रखर राष्ट्रवादाचा भावही जागृत केला.
राज्यसभा खासदार धनंजय महाडिक व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही काव्य मैफल घेण्यात आली. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या संकल्पनेतूनही काव्य मैफल साकारली.
यावेळी वाजपेयी यांचा काव्य प्रवास, देशप्रेमाचा भाव याची माहिती निवेदनातून देण्यात आली. वाजपेयी यांचे बालपण उत्तर प्रदेशात गेले, तेव्हा उत्तर प्रदेशात शायरी व कवितांची संमेलने होत होती. यातून त्यांना विद्यार्थीदशेत कवितांच्याविषयी आवड निर्माण झाली. शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी ‘ताजमहल’ विषयी कविता लिहिली. त्यासोबत त्यांच्या अनेक कविता खोल अर्थ सांगणाऱ्या मार्मिकतेचा गुण असलेल्या होत्या. त्या रसिकांना भावल्या तसे त्यांना विविध कवी संमेलनात कविता सादर करण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. यातून त्यांच्या कविता अधिक समृद्ध होत गेल्या. पुढे ते राजकारणात सक्रिय झाले. तरीही त्यांचा कवितांचा छंद कायम राहिला. त्यांनी लिहिलेल्या निवडक कविता या मैफलीत सादर झाल्या.
भारताचे स्वातंत्र, फाळणीचा लोकजीवनावर झालेला परिणाम, मानवी भावभावना, संस्कृती, पौराणिक सार, मैत्री, सद्भावना, आदर सन्मान अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी सजलेल्या कविता तितक्याच तन्मयतेने गायकांनी या काव्य मैफलीत सादर केल्या.
गायक अजित परब, शरयू दाते यांनी कवितांचे गायन केले. तर संगीतकार कमलेश भडकमकर यांनी कवितांना संगीत साज दिला. अभिनेते सचिन खेडेकर, अंबरिश मिश्र यांनी सहज सुंदर निवेदनातून वाजपेयी यांच्या कवितांचा प्रवास उलगडला.
‘जयंती उत्सव पुरतेच मर्यादित राहून उपयोग नाही, तर अटल बिहारी वाजपेयी या प्रतिभा संपन्न व्यक्तीच्या कर्तृत्वाला उजाळा मिळणे आवश्यक आहे. नव्या पिढीलाही त्यांच्या कवितेतून देशभक्तीची प्रेरणा मिळावी, यासाठी उपक्रम राबवला असल्याचे मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, पृथ्वीराज महाडिक, अनिरुद्ध कोल्हापुरे, महेश जाधव, सत्यजित कदम, राजसिंह शेळके, केशव गोवेकर, हर्षद कुंभोजकर, सचिन तोडकर आदी उपस्थित होते.
....
तुडुंब भरलेले सभागृह भारावले
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता दीर्घ काळापासून वाचकप्रिय आहेत. या कविता मराठी संगीतकारांनी संगीतबद्ध केल्या. नामांकित गायक व वादकांनी काव्य सादरीकरणात सहभाग घेतला. निवडक कवितांचे अर्थ व आशय निवेदनाद्वारे मांडला. सुरेल स्वरसाजात कविता सादर झाल्या. शब्दाला सूर-ताल-लय यांची उत्तम साथ लाभली तशी काव्य मैफल रसिकांच्या काळाजाला साद घालत गेली. तुडुंब भरलेले सभागृह भारावून गेले.