
घरेलू कामगारांच्या विमा संरक्षणासाठी प्रयत्नशील आमदार प्रकाश आवाडे
71042
इचलकरंजी : घरेलू महिला कामगारांना ओळखपत्राचे वाटप करताना आमदार प्रकाश आवाडे. सोबत प्रकाश दत्तवाडे, राजू बोंद्रे आदी.
घरेलू कामगारांच्या विमा
संरक्षणासाठी प्रयत्नशील
आमदार प्रकाश आवाडे; शासकीय ओळखपत्रांचे वाटप
इचलकरंजी, ता. २६ : घरेलू महिला कामगारांना विमा संरक्षण मिळण्यासह त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळावी, त्याचबरोबर स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व लाभ मिळावेत, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
येथील नवक्रांती महिला कामगार विकास संस्थेतर्फे घरेलू महिला कामगारांना शासकीय ओळखपत्रांचे वाटप कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार आवाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते. कार्यवाह सुवर्णा लाड यांनी स्वागत केले. अध्यक्षा मंगल सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी घरेलू महिला कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह केला. महिला कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची मांडणी करीत त्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून या महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची मागणी केली. याप्रसंगी माजी नगरसेवक राजू बोंद्रे, नरसिंह पारीक, शैलेश गोरे, अनिता जाधव, रंजना माणगांवकर, तुळसाबाई काटकर, मालन पोवार, हौसाबाई खामकर, संपदा गायकवाड यांच्यासह घरेलू महिला कामगार उपस्थित होत्या. रमेश पाटील यांनी आभार मानले.