अरेरे...४४७ झाडांवर चालणार कुऱ्हाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरेरे...४४७ झाडांवर चालणार कुऱ्हाड
अरेरे...४४७ झाडांवर चालणार कुऱ्हाड

अरेरे...४४७ झाडांवर चालणार कुऱ्हाड

sakal_logo
By

71163
गडहिंग्लज : संकेश्‍वरकडून शहरात प्रवेश करताना शेरी ओढ्याजवळ असलेली ही वनसंपदा आता इतिहासजमा होणार आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)


अरेरे...४४७ झाडांवर कुऱ्हाड
गडहिंग्लज शहर; हरित शहराची ओळख होणार पुसट
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : काय ती झाडी...काय ती हिरवाई...काय तो गारवा... ही हरित गडहिंग्लज शहरात प्रवेश करतानाची ओळख आता पुसट होणार आहे. संकेश्‍वर रोडवरील शेरी ते आजरा मार्गावरील गिजवणे ओढा या दोन किलोमीटरच्या अंतरातील ४४७ झाडांवर कुर्‍हाड चालणार आहे. निमित्त आहे संकेश्‍वर-बांदा महामार्गाचे. परिणामी शहरातील मुख्य मार्गाला भकासपणा येणार आहे.
संकेश्‍वर-बांदा महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी गडहिंग्लज शहर वगळता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा झाडांची तोड झाली आहे. आता नगरपरिषद हद्दीतील शेरी ओढा ते गिजवणे ओढ्यापर्यंतची झाडे काढली जाणार आहेत. त्यासाठी नगरपरिषदेने दोन दिवसापूर्वी जाहीर लिलाव प्रसिद्ध केला आहे. हे अंतर दोन किलोमीटरचे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लहान-मोठ्या झाडांची संख्या अधिक आहे. त्यातील प्रत्यक्ष महामार्ग कामात ४४७ झाडे अडथळा ठरणार आहेत. त्याचे टॅगींग केले आहे. त्याच झाडांची आता तोड होणार आहे. दोन किलोमीटर अंतराचे तीन टप्पे करुन त्यानुसार झाडांचा लिलाव होणार आहे. लिलावासाठी या झाडांची ३ लाख ७ हजार इतकी न्यूनतम किमत ठरविली आहे. दरम्यान, शहर हिरवेगार करण्याची मोहिम पंधरा वर्षापासून सुरू आहे. या दरम्यान हजारो झाडे लावून जगविण्यात आली. त्यातूनच हिरेवगार शहर म्हणून गडहिंग्लज नावारुपाला आले आहे. आता वृक्षतोडीनंतर ती नव्याने निर्माण करावी लागणार आहे.
-------------
चौकट...
कुऱ्हाड चालणारी झाडे...
- शेरी ओढा ते रिलायन्स पेट्रोल पंप : ११९
- रिलायन्स पेट्रोल पंप ते पशुवैद्यकीय दवाखाना : १६१
- पशुवैद्यकीय दवाखाना ते गिजवणे ओढा : १६७
- वड, पिंपळ, लिंब, रेन ट्री, गुलमोहोर, हिरवा कॅशिया, करंज, बदाम, बाभळ, ऑस्ट्रेलियन बाभूळ, कॅशिया, नीलमोहोर, वाळवा, कॅथोलिया, रोहिया या जातीच्या झाडांची तोड होईल.
-------------
लागवड दुप्पट, पण...
हायवेसाठी तोडीच्या दुप्पट वृक्ष लागवडीची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची आहे. यामुळे शहरातही दुप्पट झाडे लागतील. मात्र ज्या मुख्य मार्गावरील वनसंपदा इतिहासजमा होणार आहे, पुन्हा त्याच ठिकाणी नवीन लागवड अशक्य आहे. यामुळे शहरातील विविध भागात, खुल्या जागेत ही झाडे लावून देण्याची जबाबदारी कंपनीने घेतल्याचे वृक्ष प्राधीकरण समितीचे अनिल गंदमवाड यांनी सांगितले.