
सिमावाद पाठिंबा
सीमावासीयांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही
कोल्हापुरातील पक्ष, संघटनांचा खंबीर पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : कर्नाटक सरकारकडून कितीही अन्याय झाला, तरीही सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे म्हणत शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, मराठा महासंघ, जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), आरपीआय, तसेच दिव्यांग बांधवांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला जाहीर पाठिंबा दिला.
भाजपच्यावतीने खासदार धनंजय महाडिक यांनी सीमावाद हा केवळ सीमावासीयांचाच नव्हे, तर कोल्हापूर आणि महाराष्ट्राचा प्रश्न आहे. यामध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सीमाभागातील नागरिकांसोबत सक्रियपणे सहभाग घेतील. खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटाकडून सीमावासीयांना पाठबळ दिले जाईल. त्यांच्या प्रत्येक लढ्यात आमचा सक्रिय सहभाग आहे आणि यापुढेही असल्याचे सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे म्हणाले, ‘आम्हाला कोणत्याही तुरुंगात टाकू देत. यासाठी यापूर्वीही अनेक वेळा आम्ही लढलो आहे. आता त्याच ताकदीने लढणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कर्नाटकच्या कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाही. तर त्यांना सडेतोड उत्तर देऊ.
राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला राष्ट्रवादी पक्षाकडून पाठिंबा देत त्यांच्या लढण्यात सहभाग घेत आहे, येथून पुढेही हा सहभाग राहणार असल्याचे सांगितले. मराठा महासंघाच्या वतीने वसंतराव मुळीक यांनी पाठबळ दिले. काँग्रेसच्या वतीने सचिन चव्हाण, जनता दलाकडून शिवाजीराव परुळेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विजय करजगार यांनी कोणत्याही मदतीला तयार असल्याचे सांगितले.
...