नववर्ष स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नववर्ष स्वागत
नववर्ष स्वागत

नववर्ष स्वागत

sakal_logo
By

नववर्षाचे स्वागत विधायक उपक्रमांनी
आध्यात्मिक आनंदोत्सव, आरोग्यविषयक उपक्रमांवर अधिक भर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत यंदा कोल्हापूरकर विविध विधायक उपक्रमांनी करणार आहेत. आध्यात्मिक आनंदोत्सवासह विविध आरोग्यविषयक उपक्रमांवर विविध संस्था, मंडळांनी यंदाही भर दिला आहे. दरम्यान, ३१ डिसेंबरच्या रात्री बंदोबस्तातील पोलिसांनाही अनोख्या पद्धतीने नववर्षाच्या शुभेच्छा काही संस्था देणार आहेत.
शहरात अक्कलकोट स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या प्रमाणावर आहेत. विविध ठिकाणच्या अशा भक्त समूहातर्फे अक्कलकोट पायी वारी यंदाही होणार आहे. पायी वारीने ही मंडळी अक्कलकोटला रात्री पोचतील. काही समूह आदल्या दिवशी अक्कलकोटकडे रवाना होतील आणि रात्रभर भजनात तल्लीन होत नववर्षाचे स्वागत करतील. येथे व्यसनमुक्तीचा संकल्प करूनच ते कोल्हापूरकडे परततील.

रंकाळा पायी प्रदक्षिणा...
रंकाळा पायी प्रदक्षिणा उपक्रमांतर्गत यंदाही ‘चाला, आरोग्यासाठी’ हा उपक्रम होणार आहे. रंकाळा संवर्धन, संरक्षण समिती व कोल्हापूर वॉकर्सतर्फे हा उपक्रम होणार आहे. सर्वांनी वर्षातून रंकाळ्याची किमान पाच वेळा परिक्रमा करावी, या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात असून, त्याला आता मोठा प्रतिसाद मिळत आहे. ३१ डिसेंबरला पहाटे चार वाजता रंकाळा परिक्रमेला प्रारंभ होणार आहे. साडेसातपर्यंत प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार प्रदक्षिणा पूर्ण करेल आणि त्यानंतर सांगता समारंभ होईल.

चौकट
नातं तांबड्याशी...
शिवाजी पेठेतील मरगाई गल्ली मंडळातर्फे यंदा ‘नातं तांबड्याशी’ अशी साद घालत रक्तदान शिबिर होणार आहे. ३१ डिसेंबरला होणाऱ्या या उपक्रमांतर्गत दिवसभर मंडळाच्या ठिकाणी रक्तदान होणार असून, इच्छुकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. रस्सा मंडळाला फाटा देऊन या मंडळाने नेहमीच विधायक उपक्रमांवर भर दिला आहे. यापूर्वी शहर आणि जिल्ह्यातील वारसास्थळांची स्वच्छता, विविध ठिकाणी वृक्षारोपण, पंचगंगा, कळंबा तलाव स्वच्छता मोहीम राबवली आहे. रक्तपेढ्यांतील रक्ताची गरज लक्षात घेऊन यंदा रक्तदान शिबिर होणार आहे.