
महावीरच्या सागरचे तिहेरी यश
पॅरा राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत
‘महावीर’च्या सागरचे तिहेरी यश
कोल्हापूर, ता. २६ : नुकत्याच झालेल्या तिसऱ्या पॅरा राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महावीर महाविद्यालयाच्या सागर कातळे या विद्यार्थ्याने तिहेरी यश मिळवले. सदरची स्पर्धा इंदूर (मध्य प्रदेश) येथे आर्मी मार्कस्मनशिप युनिट महू येथील शूटिंग रेंजवर झाली. सागरने १० मीटर एअर रायफल प्रकारात ५८३.३ गुणांसह पात्रता फेरीत द्वितीय स्थान मिळवले. या क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत त्याला अनुक्रमे १० मीटर एअर रायफल स्टँडिंग (ज्युनिअर) रौप्य पदक, १० मीटर रायफल प्रोन (ज्युनिअर) रौप्य व संघासाठी रौप्य अशी एकूण ३ रौप्य पदके मिळाली. बालेवाडी पुणे येथील गन फॉर ग्लोरी या अॅकॅडमी अंतर्गत प्रशिक्षक किरण खंदारे, अनिल पवार, स्वरुप उन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करीत आहे. प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी त्याचे अभिनंदन केले.