फुलपाखरु आकर्षण करणारे गवतातील एका प्रजातीची फुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलपाखरु आकर्षण करणारे गवतातील एका प्रजातीची फुल
फुलपाखरु आकर्षण करणारे गवतातील एका प्रजातीची फुल

फुलपाखरु आकर्षण करणारे गवतातील एका प्रजातीची फुल

sakal_logo
By

71392
हबेआमरी ऑर्किड फूल.

हबेआमरी ऑर्किड फुलाचे
फुलपाखरे, पतंगांना आकर्षण
डॉ. दांगट यांचे संशोधन; पश्‍चिम घाटात आढळ
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : छायाचित्रात दिसतेय ते आहे हबेआमरी ऑर्किड फूल. आषाढ सुरू झाला की, हिरव्यागार गवताळ कुरणात चांदण्याचा सडा जसा पसरलेला असतो, त्याप्रमाणे जागोजागी ही फुले लक्ष वेधून घेतात. जिथे गवताळ कुरण आहे, तिथे हबेआमरी फूल हमखास दिसते. या फुलांवर प्रचंड प्रमाणात फुलपाखरे, पतंग आकर्षित होतात. अशा या फुलांवर विवेकानंद कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भाऊराव दांगट हे पहिल्यांदाच संशोधन करत आहेत.
पावसाळा सुरू झाला की, पश्‍चिम घाटातील गवताळ कुरणात विविध प्रजातींच्या फुलांचा सडा पसरलेला दिसतो. हबेआमरी ऑर्किड फूल हेबेनेरिया कुलातील आहे. भारतात हबेआमरीच्या ८० प्रजाती सापडतात. त्यापैकी ५० प्रजाती पश्‍चिम घाट परिसरात, तर काही प्रजाती कास पठारावरही (जि. सातारा) दिसतात. पन्हाळा तालुक्यातील मसाई पठारावरील गवताळ कुरणांत हबेआमरी प्रजातींच्या फुलांचा सडा पसरलेला दिसतो. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत २५/३० हबेआमरीच्या प्रजाती आहेत.
डॉ. दांगट म्हणतात, ‘‘गवतात उगवणारं हे फूल जरी दिसायला अन्य गवताळ फुलांप्रमाणे असले, तरी ते वैशिष्ट्यपूर्ण आहे; कारण या फुलाचे परागीभवन रात्री होते. रात्री साडेआठ ते पहाटे साडेपाच कालावधीत या फुलांकडे काही पतंग, तर दिवसा फुलपाखरांचे थवे मकरंद (मध) शोषून घेण्यासाठी येतात. तेव्हा हबेआमरीत परागीभवन होते. सर्वसाधारपणे या प्रजातीतील फुले अधिक प्रमाणात पांढरी असतात; मात्र काही प्रजातीत हिरवी, तर पिवळ्या रंगाचीही फुले असतात. काही फुलांना गोड वास, काही फुलांना उग्र वास असतो. गोड/उग्र वासामुळे पतंग, फुलपाखरे आकृष्ट होतात. हबेआमरी ऑर्किड फूल जसे आंबा, अन्य झाडांवर उगवते, तशाच पद्धतीने ते जमिनीवर गवताळ प्रदेशात येते. बटाट्यासारखा दिसणारा कंद जमिनीत असतो. पाऊस सुरू झाला की, या कंदापासून हबेआमरी ऑर्किड फूल उमलू लागते. जून ते डिसेंबर अखेरपर्यंत गवताळ भागात ही फुले तुम्हाला दिसतात. हबेआमरी ऑर्किडला फुले, शेंगा येतात. एका शेंगेत लाखो बिया असतात. या बिया सूक्ष्मदर्शकाखाली पाहाव्या लागतात. वाऱ्यांद्वारे बिया सर्वत्र पसरतात. अगदी कोकणापर्यंत वाऱ्याद्वारे बियांचा प्रसार होतो. जिथे या बिया पडतात, तिथे विशिष्ट बुरशीच्या साह्याने ते बीज उगवते.’’
--------------
चौकट
हेबेनेरिया ऑर्किडची वैशिष्ट्ये
- उष्णकटिबंध, उपोष्णकटिबंधात हेबेनेरिया जमिनीवर उगवणारी ऑर्किड
- भारतात एपिफायटिक हेबेनेरिया क्रिनिफेरा वगळता सर्व प्रजाती जमिनीवर उगवतात
- आकर्षक बुके तयार करण्यासाठी हेबेनेरियाच्या प्रजातीतील फुलांचा वापर
- हेबेनेरिया भारतामधील गवताळ भागात दिसते.
- पावसाळ्यात लवकर वाढते, डिसेंबरपर्यंत फुलत राहते.
----------------
धोका काय आहे?
- नागरीकरण, औद्योगिकरण, रस्ते विकास, जंगलांना आगी लागणे
- धरणे बांधणे, भूस्खलन, खाणकाम, मोठे-सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प, पवनचक्क्या
- गवताळ कुरणात अतिचराई
- ऑर्किडस्‌ फुलांची, प्रजातीची चोरी
- वातावरण बदल, काही घातक बुरशींचे आक्रमण