ज्येष्ठांचा फिटनेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठांचा फिटनेस
ज्येष्ठांचा फिटनेस

ज्येष्ठांचा फिटनेस

sakal_logo
By

भोगावती पुरवणीसाठी...
--------------------

ज्येष्ठांचा फिटनेस
ज्येष्ठांबद्दलचा विषय खरंतर खूप मोठा आहे. त्याला पैलूही अनेक आहेत. एका लेखात सगळ्यांना न्याय देणे शक्य होत नाही. खरंतर शैशव, तारुण्य, प्रौढत्व, यापुढची नैसर्गिक अवस्था म्हणजे वृद्धावस्था, म्हातारपण किंवा वार्धक्य हा कोणताही आजार अथवा विकार नव्हे, तर ती सामान्य नैसर्गिक अवस्था आहे. गेली २८ वर्षे माझ्या कन्सल्टिंगमध्ये १० वर्षे कौन्सिलिंग सेंटरमध्ये आणि तीन वर्षे मेमरी कॅफेमध्ये बऱ्याच ज्येष्ठांची ओळख, बोलणे, सहानुभूती, औषधोपचार, समुपदेशन सेवा सुरू असते. त्यातील काही गोष्टी शेअर करीत आहे. ज्यात अडचणी आणि उपाय एकत्र असतील.
- डॉ. कल्याणी कुलकर्णी
जुगाड कौन्सिलिंग सेंटर
M.D. (HOM) and Counsellor
शाहूपुरी, कोल्हापूर
..............
सर जेम्स रॉस म्हणतात, “You do not heal old age, you protect it, you promote it, you extend it” ज्येष्ठांचा अभ्यास आणि रुग्णसेवेसाठी Gerontology असा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. ज्येष्ठत्वाला सामोरे जाण्यासाठी खालील काही विभागांमध्ये तयारी करावी लागते.

शारीरिक फिटनेस
वयाप्रमाणे काही शारीरिक बदल आणि आजार होणारच आहेत. डोळे, दात, कान, हाडे, रक्तवाहिन्या, सांधे, हृदय, पचनसंस्था, श्वसनसंस्था, मधुमेह, जंतुसंसर्ग, मेंदूचे बदल आणि आजार ही अविभाज्य अंगे आहेत, पण आपण सशक्त असलो तर यातील बऱ्याच गोष्टींना आपण उत्तमरीत्या सामोरे जाऊ शकतो. नियमित व्यायाम, हाडांची काळजी, स्वतःचा तोल सांभाळणे, योग्य आहार ठेवला गेला तर हे आजार बळावणार नाहीत.

मानसिक फिटनेस
ज्येष्ठ झाले तरी व्यक्ती तीच असते. म्हणतात ना ‘निवृत्ती एक- प्रवृत्ती अनेक’, त्यामुळे जगण्याचे सूत्र, स्वभाव, धारणा यात काही बदल नसल्याने नवीन दृष्टिकोनात सामावून घेण्याचा प्रयत्न होत नाही. आणि वैयक्तिक धारणा ज्या समाजात आपले कुटुंब सामावलेले असते, वाढलेले असते तशाच होतात.
बालवयातील काही वैचारिक अपरिपक्वतेमुळे, इतरांवर अवलंबून राहण्याच्या सवयीमुळे, पूर्वग्रहदूषित विचारांमुळे, अडाणी, समजुती, अविवेकी कल्पना, अंधश्रद्धा, पुनर्विचारांची अक्षमता अशा बऱ्याच कारणांमुळे वार्धक्याचा स्वीकार होणारे बदल न आवडणे, आपली किंमत कमी होते आहे ही भावना जास्त अंगी भिनते, नात्यांमधला वाढता अस्वीकार जास्तीत जास्त त्रासदायक ठरतो. त्यातच मन कमकुवत होणे, हळवेपणा, चिडचिड, मत्सर, राग, मुडस्विंग पाहायला मिळतात. लैंगिक भावनांची हाताळणी (Management) कमी पडते. समोरच्या गोष्टीतील अनुकूलता माहिती नसल्याने अॅन्झायटी, डीप्रेशन, withdrawal Personalities Disorder असे काही मनोविकार किंवा मानसिक आजारांकडे ज्येष्ठ झुकायला लागतात. मानसिक दु:खाचे मूळ हे आपले विचार-भावना, विचार-भाषा यातच असते. विचारांची अवास्तवता, तर्कदृष्टता यामुळे जास्त दुःख होते, हे जर लक्षात आले तर आपण मनाचा समतोल राखून भावनिक आरोग्य उत्तम ठेवू शकतो. आणि आपल्या दुःखाचे मूळ आपणच आहोत, हा जीवन दृष्टिकोन मिळाला की स्वतःकडे, इतरांकडे, जीवनाकडे पाहण्याचा अर्थ लक्षात येतो व आपण आयुष्य आनंदाने घालवू शकतो.

आर्थिक गरजा
बदलत्या काळानुसार प्रत्येक जण पैसा, प्रॉपर्टी, दागिने, संस्कार या रूपात वार्धक्याची तयारी करीत असतो. त्यामुळे पूर्वीइतके वेदनादायक म्हातारपण न राहता ते वेलप्लान्ड सेकंड इनिंगसारखे घेतले जाते. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. साधन उर्वरित प्रवासासाठी पुरेल इतपत असावे, असे म्हणतात. खरंतर म्हातारपणात जगण्यासाठी जास्त पैसा लागतो. आपल्या भौतिक गरजा त्याच असतात, आहार कमी झालेला असतो; परंतु गोळ्यांची संख्या वाढते. इथेच महत्त्वाचा निर्णय चुकू शकतो. पैशांचा निर्णय ‘प्रॅक्टिकली’ घ्यावा लागतो; पण ज्येष्ठ मात्र तो भावनिकरीत्या घेतात व अत्यंत अडचणीत सापडतात. म्हणून कायदेशीर सल्ला घेऊन आपल्या मृत्यूनंतरच हस्तांतर करणे योग्य ठरते.

एकटेपणाचे काय?
ज्येष्ठत्व जणू काही वानप्रस्थाची तयारीच असते. विवेकानंद म्हणतात तसं Detached attachment असं मार्गक्रमण करता आलं तर उत्तम; परंतु याची सुरुवात तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे ‘जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान’प्रमाणेच करायला हवी. कारण संसारात चूक आणि बरोबर असा मापदंड कधीच नसतो. ते प्रत्येकाच्या बघण्याच्या दृष्टिकोनातून पडत असतं. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्यामुळे मी असं केलं, तसं केलं याचा संबंध फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्याशी असतो. बऱ्याचदा मुलांवर इतकं प्रेम करून आपणच त्यांना आयुष्यभर पांगळं (Dependent) करून ठेवतो. परंतु, इथेच आपल्याला आपली मूल्यवस्था, तत्त्वे, नैतिकता, जीवनशैली, मानवी व्यवहार हे मुलांना, नातवंडांना संवादातून शिकविता आले पाहिजेत, समजावून सांगता आले पाहिजेत. कौटुंबिक व्यवस्था किती गरजेची आहे हे समजले पाहिजे. शेवटी नवरा-बायको एकटे राहिले तरी उरलेले आयुष्य एकटे राहिल्यावरच्या उपाययोजना सांगता आल्या पाहिजेत.

सामाजिक वावर
मनुष्य सामाजिक प्राणी आहे. समाजाशिवाय जगणं म्हणजे पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखं आहे. जो मोकळा सोडला, तरी उडणं विसरून जातो. आपल्यात पुरेपूर अंतर्बाह्य बदल समाजात वावरलं तर होत असतात. समाज हा आरशासारखा असतो आणि त्याची अत्यंत गरज असते. मेंदू कार्यरत ठेवण्यासाठी अगदी स्वयंपाकाच्या रेसिपीपासून ते जगाच्या राजकारणापर्यंतच्या गप्पा Philosophy and Spiritualties चे inputs मिळवत राहणे अतिशय गरजेचे आहे.

बौद्धिक फिटनेस
वार्धक्य आले म्हणजे स्मृतिभ्रंश होतो ही शंका अनेकदा सामोरी आली आहे. परंतु, वार्धक्य आणि स्मृतिभ्रंश याची लक्षणे वेगळी आहेत. स्मृतिभ्रंश हा neurodegenerative, organic, irreversible आजार असून, यात आकलनशक्ती कमी होते. त्यामुळे स्मृतिभ्रंश, अल्झायमर, पार्किंगसन्स आदी आजारांकडे वाटचाल सुरू होते. यात Amnesia म्हणजे अलीकडच्या घटनांचे विस्मरण. Atypical Depression म्हणजे नैराश्य, Aphasia म्हणजे शब्दांचे तारतम्य विसरणे, Agnosia म्हणजे विषयाचा गाभा विसरणे, Apraxis म्हणजे सातत्याने होणारी शारीरिक हालचाल या गोष्टींचा समावेश होतो. ज्यामुळे हळूहळू स्मृती कमी होते, वर्तुणकीत परिवर्तन होण्यास सुरुवात होते. त्यामुळे व्यक्तीचे वैयक्तिक अर्थार्जन व समाजकारण थांबते. याचा परिणाम कुटुंबावर व भारताच्या अर्थकारणावर होतो. म्हणूनच यासाठी मेमरी कॅफे, हास्य क्लब, वाचन कट्टा आदींसारख्या उपक्रमांना जोडले जाऊन आपली बौद्धिक क्षमता वाढविणे, मेंदूच्या कार्यक्षमतेची चाचणी करणे, येणाऱ्या अडचणींवर समुपदेशन घेणे योग्य ठरते. वेळेवर निदान झाल्यास व्यक्ती यातून नक्कीच बाहेर पडू शकते. वरील सर्व मुद्दे माझ्या रुग्णाच्या बोलण्यातून, समुपदेशनातून जुगाड कौन्सिलिंगच्या माध्यमातून, वाचनातून आणि आलेल्या अनुभवातून लिहिले आहेत. आयुष्याचा अर्थ भावनिक आरोग्य उत्तम व आनंदी असले पाहिजे. जर वरील टप्पे आपण वापरत असाल, वापरणार असाल तर गोंदवलेकर महाराज म्हणतात, तसं ‘रोजच मनाची दिवाळी होते.’