
वारणा नदीवरील बंधाऱ्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी
71586
वारणा : नदीवरील कोथळी-समडोळी दरम्यानचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा.
वारणा नदीवरील बंधाऱ्याच्या
स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी
कोल्हापूर पाटबंधारे मंडळाला निवेदन
दानोळी, ता. २८ : येथील वारणा नदीवरील दानोळी-कोथळी-समडोळी दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी करण्यात आली. याबाबत येथील जयदीप धनाजीराव थोरात यांनी कोल्हापूर पाटबंधारे मंडळच्या अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर बऱ्याचदा पिलर व बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूची पडझड झाली आहे. त्याची प्रत्यक्ष किरकोळ डागडुजी झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या आणि जीविताच्या बाबतीत विचार करता सदर स्थितीत बंधारा तांत्रिकदृष्ट्या कमकुवत आहे. बंधाऱ्यांसारख्या गंभीर बाबतीत आपल्या खात्याकडून दुर्लक्ष होणे ही बाब गंभीर आहे. यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी करत आहे. स्ट्रक्चरल ऑडिट आपण तातडीने केले, तर आजअखेर केलेली डागडुजी निकृष्ट आहे आपणास हे समजेल. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे आर्थिक नुकसान, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न व संबंधित नागरिकांच्या जीविताचा प्रश्न आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटमुळे जबाबदार व्यवस्थेवर योग्य ती कारवाई होईल आणि स्ट्रक्चरल ऑडिटनंतर बंधाऱ्याचे कामही दर्जेदार होईल. गेल्या महिन्याभरापासून वारणा नदीतील पाण्याच्या पातळीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बंधाऱ्याचे दरवाजे बंद करूनही पाण्याची पातळी आवश्यक न राहिल्याने नागरिकांनी तक्रार केली होती.