स्वच्छ हवा कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ हवा कार्यक्रम
स्वच्छ हवा कार्यक्रम

स्वच्छ हवा कार्यक्रम

sakal_logo
By

सर्वेक्षणाशिवाय ‘स्वच्छ हवा कार्यक्रम’
कारणांचे मूळ शोधण्याआधीच उपाय; निधीच्या योग्य विनियोगाचे आव्हान
उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः धूर निर्माण करणारे भाग कोणते, त्यात हॉटेल्‍स-बेकरी-जनरेटर या कारणांचे प्रमाण कोठे जास्त आहे, धुलिकणांची जास्त निर्मिती कशामुळे होते, याचे सर्वेक्षण करण्याआधीच राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाची तयारी महापालिकेत सुरू आहे. सर्वेक्षणाशिवाय कामे प्रस्तावित करायची म्हणजे ‘आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी’ असा प्रकार होणार आहे. आठ कोटी रुपयांच्या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी महापालिकेने गांभीर्याने सर्वेक्षण करण्याची गरज आहे.
सूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण कमी करून हवा स्वच्छ करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून आठ कोटींचा निधी दिला आहे. हवा स्वच्छतेसाठीच्या विविध उपाययोजना त्यातून करायच्या आहेत. नोव्हेंबरमध्ये आलेल्या निधीनंतर सोमवारी त्याबाबतच्या समितीची बैठक झाली. निधी विनियोगाबाबत ज्या काही सूचना केल्या आहेत, त्यात सर्वेक्षणाचाही समावेश आहे; पण तो न करताच महापालिकेने उपाययोजनांवर चर्चा केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ शहरातील मोजक्या तीन ठिकाणची हवा तपासते. त्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणांहूनही हवेचे प्रदूषण होत असते. ती ठिकाणे जर सर्वेक्षणामधून शोधली तर तिथेच काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येऊ शकतील. हवा प्रदूषणाची कोणती कारणे, कोणत्या भागात जास्त आहेत, त्यानुसार उपाय करणे शक्य होईल; पण महापालिकेने ते न करताच काही ठिकाणी कार्यक्रमांतर्गत कारंजासारखी कामे चर्चेसाठी ठेवली.
महापालिकेचा कचरा डेपो हे हवा प्रदूषणाचे मोठे ठिकाण आहे. कचऱ्याचे डोंगर पेटून त्यातून प्रदूषित हवा सर्वत्र पसरते. तसेच स्मशानभूमीत पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या अंत्यसंस्कारातूनही धूर निर्माण होतो. पर्यटकांची शहरात येणारी वाहने कमी करण्यासाठी इलेक्ट्रिकल वा सीएनजी बसचा वापर करता येऊ शकतो. या प्रदूषणाच्या प्रमुख कारणांचा निपटारा नवीन कार्यक्रमातून काही प्रमाणात करता येणे शक्य आहे. त्यासाठी सर्वेक्षणातील मिळणाऱ्या माहितीतून मोठी मदत मिळू शकते.

चौकट
धुळीचे पेव
खराब रस्त्यांमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे हे एक कारण सांगितले जाते; पण रस्ते प्रकल्पातून तयार केलेल्या रस्त्याच्या दुभाजकाजवळ धुळीचे थर साचलेले दिसतात. तो रस्ता सुस्थितीत असूनही वाहने गेल्यावर तिथून जी धूळ उडते तिथून धूळ केव्हा काढलेलीच नाही. अनेक रस्त्यांवर ही स्थिती आहे. मध्यंतरी महापालिकेने भाडेतत्वावर स्विपिंग मशिन घेतली होती. आता ती धूळ कमी करण्यासाठी निधी आला असल्याने अशा एक वा दोन मशिन महापालिकेने खरेदी केल्यास रस्त्यावरील धुळीचा बऱ्यापैकी त्रास कमी होऊ शकतो.

कोट
बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे सर्वेक्षणासाठी प्रस्ताव मंजुरीकरिता ठेवला जाणार आहे. तसेच इतर विषयांबाबतही परिपूर्ण माहिती घेऊन पुढील बैठकीत ती सादर केली जाणार आहे.
-समीर व्याघ्रांबरे, पर्यावरण अभियंता.