कापूस, सूत, कापड दरात घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कापूस, सूत, कापड दरात घसरण
कापूस, सूत, कापड दरात घसरण

कापूस, सूत, कापड दरात घसरण

sakal_logo
By

कापूस, सूत, कापड दरात घट
यंत्रमाग उद्योगात अस्वस्थता; सहा महिन्यात सुमारे ४५ टक्क्यांची घसरण
पंडित कोंडेकर : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २८ : वस्त्रोद्योगातील महत्वाचे घटक असलेल्या कापूस, सूत आणि कापड यांच्या दरात गेल्या सहा महिन्यात सुमारे ४५ टक्के इतकी घसरण झाली आहे. त्यामुळे मंदीचे वातावरण निर्माण होत असल्यांने यंत्रमाग उद्योगात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर कापडाला मागणी येईल, अशी मोठी आशा होती. मात्र अद्याप त्यादृष्टीने अनुकूल असे वातावरण निर्माण झालेले नाही. परिणामी, कापड उत्पादीत करायचे की नाही, अशा चिंतेच यंत्रमागधारक आहेत.
गेल्या कांही वर्षापासून यंत्रमाग उद्योग अनेक अडचणीतून जात आहे. वीज दराच्या प्रश्‍नामुळे तर उद्योग अत्यंत अस्थीर बनला आहे. या उद्योगाच्या ठोस मदतीबाबतची शासन पातळीवरील उदासिनता सातत्याने समोर येत आहे. हा उद्योग जगण्यासाठी बुस्टर डोसची आवश्यकता असतांना सवलतीचे अनेक प्रस्ताव बरीच वर्षे प्रलंबित राहत आहेत. राजकीय पाठपुरावा सातत्यांने होत असताना वीज दरातील अतिरिक्त सवलत आणि व्याज दरातील सवलतीचे प्रस्ताव अद्याप मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे अनेक यंत्रमागधारकांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.
दुसरीकडे गेल्या सहा महिन्यात कापूस, सूत आणि कापड दरात मोठी घसरण झाली आहे. साधारणपणे ४० ते ४५ टक्के इतकी दरातील घसरण यंत्रमाग उद्योगाच्या मूळावर येत आहे. कापूस दरात उच्चांकी वाढ झाली. पण नंतर त्यामध्ये झालेल्या घसरणीमुळे सूत दरही अपेक्षेपेक्षा कमी आला. सूत दर कमी झाला की कापडाला मागणी येत नाही, अशी सर्वसाधारण परिस्थीती असते. आणि सूत दरात वाढ झाली की यंत्रमागधारकांना आर्थिक फटका सहन करावा लागतो, अशा दुहेरी संकटाचा नेहमी यंत्रमागधारकांना सामना करावा लागतो. त्यामुळे या उद्योगात प्रचंड अस्थीरता पहावयास मिळते.
दिवाळीनंतर कापडाला दर व मागणी येईल, अशी अपेक्षा होती. दोन वर्षाच्या खंडानंतर लग्न सराई धुमधडाक्यात सुरु आहे. पण त्याचा अपेक्षीत फायदा यंत्रमाग उद्योगाला होतांना दिसत नाही. त्यानंतर गुजरात निवडणूकीनंतर व्यापारी वर्गाकडून कापडाला मागणी येईल, अशी आशा होती. पण त्यानंतरही बाजारात चित्र सामसूम आहे. त्यामुळे नुकसानीत जावून कापड उत्पादीत करायचे काय, अशी गंभीर संकटात यंत्रमागधारक आहे. नुकसान होत असल्यामुळे कारखाना बंद ठेवता येत नाही, अशा विचित्र परिस्थीतीतून सध्या यंत्रमागधारक जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना यंत्रमाग उद्योगाचा प्रवास मंदीतून तेजीकडे कधी होणार, याची प्रतीक्षा लागली आहे.
-------------------
चौकट
मार्च एन्डींगची धास्ती
कोरोनाचे संकट संपल्यानंतरही यंत्रमाग उद्योगाने अद्याप अपेक्षीत गती घेतलेली नाही. त्यामुळे या उद्योगातून होणारी आर्थिक उलाढाल कांहीशी ठप्प आहे. त्यातच ३१ मार्च येत आहे. बँक हप्ते, घरफाळा भरण्यासाठी यंत्रमागधारकांना मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत.
-------------------
वस्त्रोद्योग धोरणाकडे लक्ष
नविन वर्षात राज्य शासन वस्त्रोद्योग धोरण जाहीर करणार आहे. यामध्ये विविध घटकांना न्याय देण्याची हमी समितीकडून देण्यात येत आहे. त्यामुळे नविन धोरण यंत्रमाग उद्योग सावरण्यास मोठी मदत करेल, अशी आस वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांना लागून राहिली आहे.
--------------------
शेअर मार्केटचा फटका
सूरत, अहमदाबाद, गुजरातमधील अनेक कापड व्यापा-यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. तेजीमुळे कापड खरेदीकडे व्यापारी वर्गाने दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता कोरोनाच्या संभाव्य संकटामुळे शेअर बाजार गडगडला आहे. परिणामी, अनेक व्यापा-यांना मोठे नुकसान सोसावा लागला आहे. त्यामुळे कापड व्यापारी सध्या शांत राहणे पसंद केल्याचे समोर येत आहे.