
शहर परिसरात प्रथमच ‘रोहन’ वृक्षाची नोंद
1855
कोल्हापूर : शाहूपुरी पहिल्या गल्लीतील रोहन वृक्ष.
71857
कोल्हापूर : रोहन वृक्षाची फुले.
शहर परिसरात प्रथमच ‘रोहन’ वृक्षाची नोंद
डॉ. मधुकर बाचूळकर यांची माहिती; दुर्मिळ वृक्ष वाचवण्याचे आवाहन
कोल्हापूर, ता. २९ : शहर परिसरात प्रथमच दुर्मिळ अशा ‘रोहन’ वृक्षाची नोंद झाली असून, तो शाहूपुरी पहिल्या गल्लीतील तात्यासाहेब मोहिते शाळेसमोर आहे. त्याची प्रथमच शहर परिसरातून नोंद करीत असल्याची माहिती ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी दिली. या दुर्मिळ वृक्षाभोवतीचा लोखंडी ट्री गार्ड खोडात शिरला आहे. खोडाच्या तळात सिमेंट घातले आहे. त्यामुळे हा वृक्ष वाळून नष्ट होण्याची भीती आहे. महापालिकेने त्याची नोंद घेऊन हा दुर्मिळ वृक्ष वाचवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
डॉ. बाचूळकर यांनी दिलेली माहिती अशी, या वृक्षाचे ‘सोयमिडा फेब्रिफ्युजा’ असे शास्त्रीय नाव आहे. कडुलिंबाच्या कुळातील असून काही महिन्यांपूर्वी परितोष ऊरकुडे यांच्या समवेत पाहिला. त्यावेळी फुले नसल्याने ओळख पटली नव्हती. गेल्या आठवड्यापासून फुलांचा बहार आल्याने, हा वृक्ष रोहनचा असल्याचे स्पष्ट झाले. रोहिन, कहीन, रक्तरोहन, रोहिणी, मांसरोहिणी अशी अनेक नावे असून इंग्रजीत ‘इंडियन रेड वुड’ असे नाव आहे. १२ ते १५ मीटर उंच वाढणाऱ्या वृक्षाचे खोड गुळगुळीत सरळसोट उंच वाढते. साल जाड असून कडवट चव असते. पानाचे टोक विशालकोनी असते. फुले लहान, पिवळसर - पांढरी व द्विलिंगी आहेत. हे वृक्ष फक्त भारत व श्रीलंकेत आढळतात. भारतात उत्तरप्रदेश, बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ येथील कोरड्या पर्णझडी जंगलात आढळतात. त्याचे लाकूड लाल रंगाचे, जाड व टणक असल्याने आकर्षक फर्निचर करण्यासाठी वापरतात. साल औषधात वापरतात. आंवेत व अतिसारात सालीचे चूर्ण देतात. ताप कमी होण्यास सालीचे चुर्ण उपयुक्त आहे. सालीचा काढा व्रण धुण्यासाठी, बस्तीसाठी, गुळण्यांसाठी वापरतात. संधिवाताच्या सुजेवर सालीचा लेप लावतात.
--------------
कोट
शहरातून अनेक दुर्मिळ वृक्षांची नव्याने नोंद केली. त्यांची संख्या एक-दोन इतकीच आहे. त्यामुळे त्यांना खास संरक्षण देण्यासाठी महापालिका प्रशासनाला अनेक वेळा पत्राने कळविले. समितीच्या बैठकीतही सूचना केल्या; पण प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. दोन-तीन वर्षांत यातील काही वृक्ष तोडले गेले. यामुळे दुर्मिळ वृक्ष शहरातून कायमचे नष्ट झाले. महापालिकेने संबंधितांवर कारवाई केलेली नाही.
- डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ.