सीमा भाग योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीमा भाग योजना
सीमा भाग योजना

सीमा भाग योजना

sakal_logo
By

सीमा भागातील मराठी भाषा
संस्कृती विकासासाठी योजना

१० लाख रुपये देणार; ८६५ गावांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्राने दावा केलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन व अभिवृद्धीसाठी राज्य शासनाने योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत सीमा भागात मराठी भाषेचे संवर्धन करणाऱ्या मराठी मंडळे व संस्थांना दहा लाखापर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे ही योजना राबवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न चांगलाच गाजत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून याप्रश्‍नी नेहमी आव्हानात्मक भाषा वापरली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने कर्नाटक व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतरही कर्नाटकडून वेगवेगळ्या पातळीवर इशारे दिले जात आहेत. महाराष्ट्राच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दोन दिवसांपूर्वीच सीमाप्रश्‍नी ठराव करण्यात आला. त्यात सीमा भागातील ८६५ गावांवर महाराष्ट्राचा हक्क असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लगेचच ही योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे.
राज्य मराठी विकास संस्थेने या योजनेअंतर्गत निश्‍चित केलेल्या विहीत कार्यपद्धती व निकषांना अनुसरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्घिंगत होण्यासाठी कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्था व मंडळे यासाठी पात्र आहेत. निवड झालेल्या प्रत्येक मंडळ किंवा संस्थेला दहा लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी १ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत विहीत नमुन्यातील अर्ज मागवले आहेत. विहीत नमुन्यातील अर्जासह यासंदर्भातील इतर माहिती राज्य विकास मराठी संस्थेच्या संस्थेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी राज्य मराठी विकास संस्था राबवत असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसाहाय्य योजना या स्वतंत्र योजनेअंतर्गत विहित केलेल्या कार्यपद्धतीवर आधारित अर्ज करण्याचे आवाहन संस्थेच्या संचालकांनी केले आहे.
.......