शिस्त लागली; विकास कामे ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिस्त लागली; विकास कामे ठप्प
शिस्त लागली; विकास कामे ठप्प

शिस्त लागली; विकास कामे ठप्प

sakal_logo
By

इचलकरंजी महापालिका
----------------------

शिस्त लागली; विकासकामे ठप्प
‘प्रशासक भरोसे’ कामकाजाची वर्षपूर्ती; महापालिकेच्या पहिल्या सभागृहाची आस

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २९ ः गेल्या वर्षभरात सुरुवातीला पालिकेचा आणि नंतर महापालिकेचा कारभार प्रशासक भरोसे सुरू आहे. या कालावधीत प्रशासकीय शिस्त लागली असली तरी लहान - मोठी विकासाची कामे मात्र ठप्पच असल्याचे चित्र दिसत आहे.
ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे सार्वत्रिक निवडणुका कधी होणार, हे कोणालाही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत प्रशासकीय कामकाजाची वर्षपूर्ती झाली आहे. किमान नवीन वर्षात तरी सभागृह अस्तित्वात येणार काय, याची आस राजकीय क्षेत्राला लागली आहे. गेल्या वर्षाअखेरीस तत्कालीन पालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत संपली. त्यानंतर प्रशासक म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांची नियुक्ती केली. त्यानंतर पुढील कालावधीत पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची चाहूल लागली. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील हालचाली वाढल्या. प्रारुप प्रभाग रचना केली. त्यावर हरकती व सूचना सुरु असतानाच महापालिका करण्याच्या प्रक्रीयेला गती आली आणि जुलैपासून इचलकरंजी महापालिका म्हणून कामकाजास सुरुवात झाली. पहिले सहा महिने पालिकेवर प्रशासक म्हणून ठेंगल यांनी कामकाज पाहिले. महापालिका झाल्यावर सुधाकर देशमुख यांनी प्रशासक तथा प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
पहिल्या सहा महिन्यांचा पालिकेचा, तर उर्वरीत सहा महिन्याचा महापालिकेचा कारभार प्रशासक भरोसे सुरू आहे. महापालिका झाल्यानंतर प्रशासकीय शिस्तीला प्राधान्य दिले. याची धास्ती कर्मचाऱ्यांनी घेतली. काही सकारात्मक बदल झाले. अतिक्रमण काढण्याचा गाजावाजा केला; पण त्यानंतर हा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाल्याचे समोर येत आहे. यासंदर्भातील वादही गाजला आहे. मात्र, दुसरीकडे विकासकामांना अपेक्षित गती आली नसल्याचे चित्र आहे. रस्ते, गटारी यासारख्या कामांनी फारसी गती घेतली नसल्याचे वर्षभरातील चित्र आहे. प्रभागातील छोटी-मोठी कामे करण्यासाठी कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न नगरसेवकांच्या माध्यमातून मार्गी लागत होते. तुलनेने प्रशासनाकडून अपेक्षित दाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता नागरिकांनाही नवीन सभागृहाची आस लागली आहे.
वर्षभरात फारशी विकासकामांनी गती घेतलेली नाही. त्यासाठी पाठपुरावा करणारी यंत्रणा नसल्यामुळे प्रशासन पातळीवर निवांतपणा दिसून येत आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवादाचे मोठे माध्यम असलेले नगरसेवक पद सध्या नाही. त्यामुळे नागरिकांनाही विविध कामे करताना अडचणी भासत आहेत. किरकोळ कामासाठी आता नागरिकांना थेट महापालिकेत हजेरी लावावी लागत आहे. मोठे तळे सुशोभीकरण आणि दूधगंगा योजनेसाठी मंजूर झालेला निधी या दोन गोष्टी वर्षभरात दखल घेण्यासारख्या झाल्या. मात्र, त्यातील दोन्ही कामांनी अद्याप गती घेतलेली नाही. सध्या केवळ प्रस्ताव तयार करणे व शासन पातळीवर पाठविणे इतकेच काम प्रशासनाकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे.
---------
इच्छुकांची घालमेल वाढली
महापालिकेच्या पहिल्या सभागृहाची सर्वांनाच आस आहे; पण सार्वत्रिक निवडणुका कधी होतील, हे सध्या सांगता येणे अशक्य आहे. सुरुवातीला नवीन वर्षात एप्रिल - मे या दरम्यान निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता गृहीत धरून इच्छुक कामाला लागले होते; पण आता पुढील वर्षाअखेरपर्यंत निवडणुका लांबणीवर पडतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढली आहे. तर अद्याप वर्षभर महापालिकेवर प्रशासनाचाच वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.