निराशाग्रस्त झाला बरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराशाग्रस्त झाला बरा
निराशाग्रस्त झाला बरा

निराशाग्रस्त झाला बरा

sakal_logo
By

उपचार होतात; संगोपनाचे काय?
रस्त्यांवर फिरणाऱ्या तीव्र मानसिक रुग्णांबाबत पोलिस, प्रशासन उदासीन

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः एखाद्या गल्लीत किंवा रस्त्यावर अनाहुतपणे आलेली फिरस्ती व्यक्ती विशेषतः महिला नीट बोलत नाही, माहिती सांगत नाही, गलितगात्र अवस्थेतील निराशाग्रस्त व्यक्तीला कोणीतरी सीपीआरमध्ये सोडतो. त्या व्यक्तीवर उपचार होतात. पण, पुढे त्या व्यक्तीला सोडावे कोठे व कोणी, अशी समस्या जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गंभीर सामाजिक विषय बनली आहे.

शहरात फिरस्त्या व्यक्ती रोज नव्याने येतात. तेवढ्याच अन्य ठिकाणी स्थलांतरित होतात. त्यातील काही भिक्षुकी करतात. काही व्यक्ती फक्त फिरत राहतात. कोणी खायला दिले तर खातात व रस्त्याकडेला झोपून जातात. अशा शेकडो व्यक्ती शहरात आहेत. मात्र, यातील काही व्यक्ती रस्त्याकडेला किंवा गल्लीत आजारी अवस्थेत पडलेल्या असतात. कोणीतरी माणुसकीच्या भावनेतून त्यांना सीपीआरमध्ये आणून सोडते. येथे वैद्यकीय यंत्रणा या व्यक्तींची स्वच्छता, जखमांवर औषधोपचार, ड्रेसिंग व अन्य लक्षणांनुसार उपचार होतात. गंभीर जखमा, गाठी आजारांवर शस्त्रक्रियाही केल्या जातात. यातील काही व्यक्ती तीव्र मानसिक रुग्ण असल्याचे दिसते. त्यांच्यावर समुपदेशन व मानसिक उपचार केले जातात. यातील तीव्र मनोरुग्ण व्यक्ती पूर्ण बोलू शकत नाहीत. नाव, पत्ता सांगत नाहीत. शारीरिकदृष्ट्या प्रकृती ठीक झाल्यानंतर अशा व्यक्तीला सोडावे कोठे, असा प्रश्न येतो.
वैद्यकीय यंत्रणा अशा रुग्णांना बरे करू शकते. मात्र, त्यांचा पुढे सांभाळ करणे मुश्कील होते. त्यांना खुले सोडून देणे हेही मानवता व सुरक्षेच्या दृष्टीने अशक्य होते. तेव्हा सीपीआरमधील काही डॉक्टर सेवाभावी संस्थांशी संपर्क करून त्यांच्याकडे त्यांना सुपूर्द करतात. काही मोजक्या संस्थांकडून प्रतिसाद लाभतो. मात्र, दर महिन्याला पाच ते सहा इतक्या संख्येने येणाऱ्या मानसिक रुग्णांचे संगोपन करण्याची सुविधा स्थानिक संस्थांकडे नाही. त्यामुळे या रुग्णांच्या संगोपनाचा पेच निर्माण होतो.

चौकट
एकत्रित उपाययोजना करण्याची गरज
अशा व्यक्तींच्या नातेवाईकांचा पोलिसांनी शोध घेणे, तोपर्यंत या व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी अन्न-वस्त्र देण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाने करणे अपेक्षित आहे. मात्र, या दोन्ही यंत्रणांकडून जबाबदारी झटकली जात असल्याचे चित्र आहे. महापालिकेने दोन ठिकाणी शेल्टर हाऊस सुरू केली आहेत. मात्र, तीही काही वेळा हाउसफुल्ल असतात, तसेच जबाबदारी घ्यावी कोणी व कशी असा प्रश्न येतो. अशा स्थितीत आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलिस व महापालिका समाजकल्याण अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

कोट
महिन्याला कमीत कमी दहा व्यक्तींवर सीपीआरमध्ये असे उपचार होतात. अशा व्यक्तींच्या निवाऱ्याचा प्रश्न येतो. यातील बहुतेक व्यक्तींचे नातेवाईक दूर कुठे तरी असतात. त्यांचा पोलिसांनी शोध घेणे व बरे झालेल्या व्यक्तींना नातेवाइकांच्या ताब्यात देण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
- डॉ. गिरीश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर