अशैक्षणिक कामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशैक्षणिक कामे
अशैक्षणिक कामे

अशैक्षणिक कामे

sakal_logo
By

शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा
तब्बल १०८ कामे; गुणवत्ता वाढणार कशी?

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. २९ : विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदाऱ्यांसह १०८ अशैक्षणिक कामे करावी लागतात. शिक्षण विभागाच्या नवनवीन धोरणानुसार त्यामध्ये वाढच होत आहे. या अशैक्षणिक कामातून मुक्त करून शिक्षकांना केवळ विद्यार्थ्याना शिकवण्याची जबाबदारी दिली, तरच शैक्षणिक गुणवत्ता वाढेल अशा प्रतिक्रिया शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.
मतदार याद्या तयार करणे, जनगणना, पटनोंदणी, हत्तीपाय निर्मूलनासाठी सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, शाळेची ऑनलाईन माहिती भरणे, यू डायसवर माहिती भरणे, शैक्षणिक अहवाल तयार करणे, शिष्यवृत्तीबाबत माहिती भरणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहारच्या नोंदी ठेवणे, धान्यसाठा नोंदविणे, धान्य - साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, विद्यार्थ्यांना धान्य वितरण करणे, प्रत्येक राष्ट्रीय कामात मदत करणे, कोरोनामुळे काही काळ रस्त्यांवरही शिक्षकांना तपासणीसाठी काम करावे लागले. अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांच्या मूळ उद्देशाला बगल दिली जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
---
चौकट
क्लार्कचे कामही शिक्षकालाच
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्लार्क नसतो. त्यामुळे प्रत्येक कामे शिक्षकांनाच करावी लागते. त्यातच आता शाळांसंदर्भात ऑनलाईन माहिती भरावी लागते. त्यामुळे शाळेतील एखाद्या शिक्षकाकडे ही सर्व कामे सोपविली जात आहेत; यामध्ये यू डायसवर माहिती भरणे, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे ही सर्व कामे त्या-त्या शाळेतील नेमून दिलेले शिक्षक करीत आहेत.
---
कोट
विविध अशैक्षणिक कामांमुळे, शिक्षकांना शिकविण्यासाठी वेळ कमी मिळतो. त्यामुळे अशैक्षणिक कामे कमी करावीत व या कामांसाठी शाळेत लिपिक तथा शिपायांची नियुक्ती करावी.
राजेशकुमार जाधव, अध्यक्ष, हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक संघ
---
शिक्षकांना दिलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची सुटका करणे गरजेचे आहे.
पद्मजा करपे, सरपंच, शिरोली.