
स्वातंत्र्याची संकल्पना मुक्त असते
72113
इचलकरंजी ः समाजवादी प्रबोधिनीमधील व्याख्यानात बोलताना उदय नारकर.
...
स्वातंत्र्याची संकल्पना मुक्त असते
प्रा. डॉ. उदय नारकर ः इचलकरंजीत समाजवादी प्रबोधिनीत व्याख्यान
इचलकरंजी, ता. ३० ः ‘स्वातंत्र्याची संकल्पना मोकाट नव्हे, तर मुक्त अशी असते. स्वातंत्र्य हे अभंग असते, ते दुभंगलेले नसावे. कारण दुभंगलेल्या स्वातंत्र्यातून सामाजिक अभंगता तयार होत नाही. ती दुभंगता दुरुस्त करावी लागेल. त्यासाठी नीतिमूल्ये अग्रस्थानी असली पाहिजेत, अशी भूमिका कोबाड गांधी यांनी आपल्या पुस्तकात मांडली आहे,’ असे मत प्रा. डॉ. उदय नारकर यांनी व्यक्त केले.
कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकात नेमके आहे तरी काय? या विषयावर समाजवादी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एफ. वाय. कुंभोजकर होते.
प्रा. नारकर म्हणाले, ‘कोबाड गांधी यांना एका संपन्न कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. ते इंग्लंडमध्ये उच्चशिक्षण घेतलेले उच्चविद्याविभूषित आहेत. शोषणमुक्त समाजव्यवस्था असली पाहिजे, या भूमिकेतून आणि स्वतःला आलेल्या अनुभवातून कोबाड गांधी डाव्या व दलित चळवळीत सक्रिय सहभागी झाले. त्यांच्यावर अनेक आरोप झाले. अनेक खटले दाखल झाले; पण एकही आरोप सिद्ध झाला नाही. एकाही खटल्यात त्यांना शिक्षा झाली नाही, हेही त्यांनी या पुस्तकात नमूद केले आहे. तुरुंगात भेटलेल्या राजकारण्यांपासून ते गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली सर्व माणसे, त्यांचे स्वभाव याचे वर्णन या पुस्तकात आहे. आपल्याला चांगले न्यायाधीश भेटले असाही त्यांनी उल्लेख केला आहे. व्यवस्था अन्यायी असेल, तर ती प्रामाणिक व नीतिवान माणसालाही दुबळी बनवते. हेही त्यांनी पुस्तकात अधोरेखित केले आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘पुस्तकामधील चिंतन आणि औचित्य या प्रकरणातील सर्वच निष्कर्ष, सगळेच दावे सगळ्यांना पटतील असे नाही. पण याचा अर्थ त्यांना नक्षलवादाचे समर्थक ठरवून या पुस्तकाच्या अनुवादाला जाहीर केलेला पुरस्कार परत घेणे चुकीचे आहे.’ प्राचार्य ए. बी. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. रमेश लवटे यांनी प्रास्ताविक केले.