बालगोपालच्या विजयात ‘ओपेरा’ अडथळा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालगोपालच्या विजयात ‘ओपेरा’ अडथळा...
बालगोपालच्या विजयात ‘ओपेरा’ अडथळा...

बालगोपालच्या विजयात ‘ओपेरा’ अडथळा...

sakal_logo
By

लोगो
72169
कोल्हापूर : शाहू छत्रपती के एस ए लीग साखळी फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्स यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)


बालगोपालच्या विजयात ‘ओपेरा’ अडथळा...
बीजीएमची बाजी; झुंजार क्लबची सम्राटनगर स्पोर्टसवर १-० गोलने मात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : शाहू छत्रपती केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळाच्या विजयात बीजीएम स्पोर्टसचा ओपेरा आज अडथळा ठरला. बालगोपालने एकची आघाडी घेतली असताना, बीजीएमकडून ओपेराने गोल करत गोलबरोबरी साधून देत बालगोपालच्या समर्थकांना जल्लोषाची संधी दिली नाही. तत्पूर्वीच्या सामन्यात झुंजार क्लबने सम्राटनगर स्पोर्टसवर १-० ने विजयाची नोंद केली. दरम्यान, बालगोपाल विरूद्ध बीजीएम यांच्यातील सामन्यापूर्वी महान फुटबॉलपटू पेले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. केएसएतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
बालगोपाल विरुद्ध बीजीएम यांच्यातील सामना पूर्वार्धात रंगला नाही. बालगोपालकडून सूरज जाधव, ऋतुराज पाटील, अभिनव साळोखे, व्हिक्टर, शुभम जाधव यांनी शॉर्ट पास देत बीजीएमची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. चढायांत आक्रमकता नसल्याने त्यांचे रूपांतर गोलमध्ये झाले नाही. उत्तरार्धातील सामन्याच्या सुरवातीला बेधडक चढाया पाहायला मिळाल्या नाहीत. चेंडू केवळ मैदानात फिरता राहिला. अखेर बालगोपालकडून सूरज जाधवने ६१ व्या मिनिटाला हेडद्वारे गोल केल्यानंतर बीजीएम स्पोर्टसचे खेळाडू इरेला पेटले. बीजीएमकडून वैभव राऊत, ओपेरा, अभिजीत साळोखे, कपिल शिंदे, केवळ कांबळे यांनी चढायांचा जोर वाढवला. ओपेराने ६६ व्या मिनिटाला बालगोपालच्या मोठ्या डीत मिळालेला चेंडू गोलजाळीच्या दिशेने ढकलला. चेंडू कसाबसा गोलजाळीत विसावला आणि खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा केला. अखेरच्या क्षणात बालगोपालने गोल आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न बीजीएमच्या बचावफळीने हाणून पाडले.
दुपारच्या सत्रात झुंजार क्लबने सम्राटनगर स्पोर्ट्सचा एकमेव गोलच्या जोरावर पराभव केला. त्यांच्या राजेश गोडेकरने ५७ व्या मिनिटाला गोल केला. सम्राटनगरला मिळालेल्या पेनल्टी किकचा फायदा उठवता आला नाही. त्यांचा अभिराज काटकर गोल करण्यात अपयशी ठरला. झुंजारकडून आकाश बावकर, अवधूत पाटोळे, प्रथमेश बाटे, कार्लोस नाला, तर सम्राटनगरकडून अक्षय सावंत, यासीन नदाफ, हिलेन यांनी चांगला खेळ केला.
--------------
चौकट
सामन्यांना ७ जानेवारीपर्यंत सुट्टी
संतोष ट्रॉफीच्या तयारीसाठी उद्यापासून (ता. ३१) ७ जानेवारीपर्यंत सामन्यांना सुट्टी राहील. ८ जानेवारीला फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरूद्ध रंकाळा तालीम मंडळ यांच्यात दुपारी दोन, तर शिवाजी तरूण मंडळ विरूद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात दुपारी चार वाजता सामना होईल.