
थर्टी फस्टसाठी ५१ ब्रेथ अनालायझर
फाईल फोटो
...
नाकाबंदीसह वाहनांची
कागदपत्रेही तपासणार
थर्टी फर्स्टसाठी ५१ ब्रेथ अनालायझरची व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः इंग्रजी वर्षाखेर अर्थात ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’मुळे अपघात होऊ नयेत यासाठी पोलिसांनी ५१ ब्रेथअनालायझरची व्यवस्था केली आहे. सुमारे दीड हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी, शंभर होमगार्ड आणि त्यांच्यासोबत राज्य राखीव दलाची एक कंपनीही रात्रभर रस्त्यावर असणार आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी असून वाहनांचीही कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत. यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलवकडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना कोणतीही कसूर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
वर्षाखेर म्हणून ३१ डिसेंबरची रात्री जल्लोष करण्यासाठी आता ऑनलाईनसह हॉटेल, रेस्टॉरंट, बिरअबार, परमीट रूममध्ये तयारी सुरू झाली आहे. आकर्षक विद्युतरोषणाईसह मेनूंच्या ऑफरचा धडाका आहे. या उत्साहाच्या वातावरणातच पोलिस प्रशासनानेही त्यांची तयारी केली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रभारी अधिकाऱ्यांना चौकाचौकात नाकाबंदी करणे, वाहनांवर लक्ष्य केंद्रित करून विनानंबर प्लेटचे वाहन ताब्यात घेणे, मोटारींच्या कागदपत्रांची तपासणी करणे, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची चाचणी ‘ब्रेथ अनालायझर’ने करावी, अशा सूचना केल्या आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये ब्रेथ अनालायझरची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडेही त्याची व्यवस्था केली आहे.
पोलिसांकडून सायंकाळी सातपासूनच रस्त्यावर बंदोबस्त असणार आहे. सुमारे तीनशे होमगार्डही रस्त्यावर असणार आहेत. कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जात आहे. तरीही राज्य राखीव दलाची एक कंपनी (सुमारे ९० जवान) ही तैनात ठेवण्यात आली आहे.
...
सर्वसामान्यांना त्रास होणार नाही
याची खबरादारी घ्या ः बलकवडे
तळीरामांमुळे आणि दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना, वाहनधारकांना त्रास होणार नाही याची खबरादारी घेण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या आहेत.