कोल्हापुरच्या गाडीला लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरच्या गाडीला लुटले
कोल्हापुरच्या गाडीला लुटले

कोल्हापुरच्या गाडीला लुटले

sakal_logo
By

ढालगावनजीक महामार्गावर
कोल्हापूरच्या प्रवाशांना लुटले

दोघे जखमी; २ लाखांचा ऐवज लांबविला

सकाळ वृत्तसेवा
ढालगाव, ता. ३० : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावरील ढालगावनजीक आगळगाव फाट्यापासून जवळच असणाऱ्या महाराजा ढाब्याजवळ कोल्हापूरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या चारचाकी गाडीला अडवून, चाकूचा धाक दाखवून १ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना गुरुवारी (ता. २९) रात्री अडीचच्या सुमारास घडली. चोरट्यांकडून झालेल्या झटापटीत दोघेजण जखमी झाले असून, माधवी जनार्दन जानकर (वय २५, घाडगे कॉलनी, कोल्हापूर), विकास परशुराम हेगडे (२२, जिल्हाधिकारी कार्यालयशेजारी, कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. याची फिर्याद भाग्यश्री विलास पाटील (२८, सरनोबतवाडी, कोल्हापूर) यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत दिली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, भाग्यश्री पाटील यांच्यासह ९ जण चारचाकीमधून (एमएच ४, इटी ८०३७) कोल्हापूरहून पंढरपूरकडे जात होते. गाडीत चार महिलांचा समावेश होता. पहाटे अडीचच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावरील ढालगावनजीक आगळगाव फाट्यापासून जवळच असलेल्या महाराजा ढाब्यापासून काही अंतरावर गेले तेव्हा अज्ञातांनी गाडीवर दगड मारला. त्यामुळे चालक भाग्यश्री पाटील यांनी गाडी बाजूला घेतली. त्यावेळी पाच अनोळखी लुटारू आले. त्यातील दोघांनी चाकू काढून माधवी जानकर व विकास हेगडे यांना जखमी केले. चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत महिलांजवळ असलेले सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रकमेसह १ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. महामार्गावर अशा लूटमारीच्या घटनेमुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे. घटनेचा तपास सहाय्यक निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत.
दरम्यान, कोल्हापुरातील माधवी जानकर यांच्या घरी याबाबत माहिती घेतली असता, लुटीवेळी त्यांच्याकडील मोबाईल हॅण्डसेटसुद्धा चोरट्यांनी काढून घेतले. त्यांना धाक दाखवून कर्णफुलेही हिसकावून घेतली आहेत. या झटापटीत त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही माहिती त्यांनी परिसरातील व्यक्तीच्या मोबाईलवरून घरी वडिलांना कळविली आहे. सध्या त्या पंढरपुरात आहेत. उद्या (ता. ३१) दुपारी एक वाजता त्यांना पोलिस ठाण्यात बोलाविले आहे. त्यानंतर त्या कोल्हापुरात येणार आहेत. चार मोटारीतून सुमारे चाळीस जण पंढरपूरला गेल्याचीही माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली.