होय, आम्ही अशाच असुविधा ठेवणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होय, आम्ही अशाच असुविधा ठेवणार!
होय, आम्ही अशाच असुविधा ठेवणार!

होय, आम्ही अशाच असुविधा ठेवणार!

sakal_logo
By

फोटो आहे.

होय, आम्ही अशाच असुविधा ठेवणार!
---
अंबाबाई मंदिरातील स्थिती; दर्शनासाठी भाविकांमध्ये विभागणी करणारी ‘सोय’
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : होय, आम्ही देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता स्वच्छतागृहाची सोय करणार नाही. होय, आम्ही भाविकांसाठी पिण्याची व्यवस्था करणार नाही. होय, भाविकांचे दर्शन नीट होईल, अशी व्यवस्था करणार नाही. फरशा काढल्या, मात्र त्याचे पुढे काय करणार, आम्हाला माहीत नाही. आम्ही सामान्य भाविक आणि व्हीआयपी भक्ती यात दरी वाढविण्यासाठीच बाहेरून एक रांग आणि स्पेशल दर्शन अशी व्यवस्था करणार. मंदिर आवारात भाविकांना बसण्यासाठी सुविधा देणार नाही..!
अंबाबाई मंदिरात भाविकांना दिलेल्या असुविधांची यादी. ही यादी भली मोठी आहे, पण यातील काही गोष्टींचाच या ठिकाणी उल्लेख केला आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांपैकी अनेक भाविक रोज देवस्थानच्या कार्यालयात जाऊन तक्रारींचा पाढा वाचत आहेत. लेखी अर्जही देत आहेत, पण या सामान्य भाविकांच्या समस्या सोडवून सुविधा देण्यात कोणालाही रस नाही. मणिकर्णिका कुंडाचे काम सुरू केले, ते अर्धवट अडकले. पत्रे मारून बंदिस्त केले. गरुड मंडपातील काम सुरू केले, पण त्या कामाची अवस्थाही फारशी चांगली नाही. एकूणच, पर्यटन वाढीसाठी म्हणून दिंडोरा पिटणाऱ्या, देवीला येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा द्यायच्या आहेत, असे सांगणाऱ्या राजकीय नेत्यांना, प्रशासनातील अधिकाऱ्यांना कागदी घोडे नाचविण्याच्या पलीकडे काहीही करायचे नाही, असेच आजच्या या उदाहरणावरून दिसते.
देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला व वृद्ध भाविकांची स्वच्छतागृहाविना होणारी कुचंबणा भयंकरच आहे. नावाला तरी ‘सुरू असलेले’ स्वच्छतागृह पाडले. मात्र, त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. महिलांना आजूबाजूच्या शाळेतील, हॉटेलमधील स्वच्छतागृहे अशांचा शोध घ्यावा लागतो. काही वेळा तर जवळच्या पोलिस ठाण्यात जावे लागते. देवस्थानच्या कार्यालयात किमान पाच ते सहा महिला रोज याविषयी विचारणा करण्यासाठी येतात, पण त्यांच्याकडे उत्तर नसते. काहींना लेखी अर्जही दिले, अन्य देवस्थानांचा आदर्श घ्या आणि निदान मूलभूत सुविधा तरी द्या, असे अर्जात म्हणणे असते. अशा अर्जांचा गठ्ठा झाला तरी चालेल; पण उपाय नाही, अशी परिस्थिती आहे.
----------------
भाविकांमध्ये दरी
अंबाबाई मंदिर असे ठिकाण आहे, की तिथे सर्वसामान्य भाविकांना समान पातळीवर दर्शन मिळेल. व्हीआयपी दर्शन व्यवस्था या ठिकाणी चालणार नाही, असा न्यायालयाचाही निवाडा आहे, मात्र सध्या सामान्य भाविक व व्हीआयपी भक्त यांच्यात मोठी दरी तयार करण्याचे काम सुरू आहे. पितळी उंबऱ्याच्या आत वशिला असलेल्यांना दर्शन दिले जाते. यातून ‘गुगल पे’ दर्शन सेवा पद्धत रुढ झाली आणि अनधिकृतपणे खुलेआम ही सेवा सुरू असते. याची एक मोठी साखळी मंदिरात तयार झाली आहे. ज्याचे वजन जास्त, त्याला दर्शन दिले जाते. फरशी काढण्याच्या नावाखाली ही दर्शन पद्धती रुढ करण्याचे काम सुरू आहे. राज्यातील एकमेव मंदिर आहे, जिथे देवीजवळून दर्शन घेता येत होते आणि भाविकांना समाधान मिळत होते. परंतु, आम्हाला भाविकांना खेळवायचे आहे, अशीच पद्धत मंदिरात सुरू असल्याचे चित्र रोज अनुभवायस येत आहे. याबाबतही अर्ज समितीकडे देण्यात आले आहेत.
-------------------------
काही चांगले; पण...
मंदिरात रोपेवाटप, महिलांसाठी कुंकुमार्चन अशा काही गोष्टी चांगल्या करण्यात येत आहेत; परंतु सामान्य भाविकांच्या सुविधांबाबत होणारे दुर्लक्ष असे चित्र मोठ्या प्रमाणात दिसते. दर्शनासाठी येणारे पर्यटक मंदिरातील असुविधांविषयी नाराजी व्यक्त करतात. कोल्हापूरचे नाव यात खराब होत आहे, याचे तरी भान धोरण आखणाऱ्यांनी ठेवायला हवे.