बोगस वारस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस वारस
बोगस वारस

बोगस वारस

sakal_logo
By

बोगस वारस दाखवून मिळवली नोकरी

‘आरोग्य’तील प्रकार ः आत्याच्या जागी भाच्याला कशी नोकरी?

निवास चौगले : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांनी सेवा पुस्तिकेत नोंदवलेल्या वारसदारांनाच नोकरी देण्याचा कायदा आहे. तथापि आरोग्य विभागात एका सफाई महिला कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यानंतर तिच्या थेट वारसदारांना डावलून दुसऱ्यांनाच नोकरी दिली आहे.
संबंधित महिलेच्या थेट वारसदारांचे नोकरी नको, असे प्रतिज्ञापत्र घेऊन तिचा भाचा याचा लाभार्थी ठरवला असून, त्याला नोकरी कशी दिली, असा प्रश्‍न आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह तिच्या वारसदारांनाही पडला आहे.
संबंधित महिलेच्या आई सेवा रुग्णालयात स्वच्छतेचे काम करत होत्या. त्यांच्या निवृत्तीनंतर थेट वारस म्हणून या महिलेला नोकरी मिळाली. त्या घटस्फोटीत असल्याने नियमानुसार त्यांना नोकरी मिळाली. त्यांची नियुक्ती गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात होती. त्यांनी सेवेत असतानाच आपला मुलगा व मुलगी यांची नावे सेवापुस्तिकेत वारस नोंद म्हणून नोंदवली आहेत. या महिला कर्मचाऱ्याचा ६ सप्टेंबर २०२० रोजी सेवेत असताना मृत्यू झाला.
सेवेत असताना मृत्यू झाल्यानंतर तिच्या थेट वारसदारांनाच नोकरी मिळू शकते किंवा संबंधित महिलेने जिवंत असताना आपला सांभाळ करण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीचा उल्लेख आपल्यानंतर नोकरीसाठी केला असेल, तर अशी व्यक्तीही पात्र ठरते; पण या प्रकरणात मृत्यूपूर्वी या महिलेने कोणालाही वारस केलेले नाही. त्यामुळे तिचा मुलगा किंवा मुलगीच नोकरीसाठी पात्र ठरतात; पण या मुलांचेच आम्हाला नोकरी नको, असे प्रतिज्ञापत्र सादर करून या महिलेचा भाचा नोकरीचा लाभार्थी ठरला आहे. २ जून २०२२ रोजी संबंधिताला नोकरीत घेण्याचे आदेश तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले आहेत. या भाच्याने दावा करण्यापूर्वी संबंधित महिलेच्या जाऊने आपल्याला वारसा हक्काने नोकरी मिळावी म्हणून अर्ज केला होता, पण तोही नंतर मागे घेण्यात तर आलाच, पण या जाऊनेही संबंधित भाच्याला नोकरीत घेण्यास हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.
................

प्रतिज्ञापत्राबाबत साशंकता
संबंधित महिलेचे थेट वारस असलेल्या मुलगी व मुलांचे प्रतिज्ञापत्र ३ डिसेंबर २०२१ रोजी सादर करण्यात आले आहे. त्यातही या दोघांनी आमच्याऐवजी आमच्या मामे भावाला (संबंधित महिलेचा भाचा) नोकरी देण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे; पण या प्रतिज्ञापत्राबाबतच साशंकता आहे. कारण यातील मुलगा हा कोल्हापुरात राहात नाही, तर मुलीचे लग्न झाल्याचे समजते.
.............

कायदा काय सांगतो?
लाड-पागे समितीच्या शिफारशीनंतर राज्य शासनाने वारस नोकरीबाबत २६ फेब्रुवारी २०१४ रोजी अध्यादेश काढला आहे. त्यात सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगारास निवृत्तीपूर्वी वारस बदलण्याचा अधिकार आहे. त्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. तसेच नव्या आदेशानुसार सफाई कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास तिचा पती, मुलगा किंवा घटस्फोटीत मुलगीच नोकरीसाठी पात्र आहे; पण कायदाच या प्रकरणात धाब्यावर बसवण्यात आला आहे.
................

आरोग्य विभागात अशी अनेक प्रकरणे

माहितीच्या अधिकार कायद्यात मिळवलेल्या माहितीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. अशाच पध्दतीने आरोग्य विभागात सफाई कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या अनेक प्रकरणांत बोगस वारस दाखवून दुसऱ्याच कोणीतरी नोकरी मिळवल्याची अनेक प्रकरणे आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अशी अनेक प्रकरणे बाहेर येणार आहेत.
..........