रोस्टर तपासणीवरच अडले काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोस्टर तपासणीवरच अडले काम
रोस्टर तपासणीवरच अडले काम

रोस्टर तपासणीवरच अडले काम

sakal_logo
By

रोस्टर तपासणीवरच अडले काम
---
विद्यापीठातील ७२ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया; जाहिरात, मुलाखतींनाही विलंब
ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : शिवाजी विद्यापीठातील ७२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. मात्र, अद्याप विद्यापीठाचे काम रोस्टर तपासणीवरच अडले आहे. प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया पूर्ण होऊन ही पदे लवकरात लवकर भरली जाणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठाचा पूर्वानुभव पाहता सर्व पदे भरली जाणारा का? ही प्रक्रिया वेळेत होणार का? अशी चर्चा अधिविभागांमधून सुरू आहे.
विद्यापीठातील प्राध्यापकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. निवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या जागी नवी नियुक्ती केली जात नाही. राज्य शासनाने प्राध्यापकांच्या भरतीवर निर्बंध घातले होते. त्यामुळे आवश्यकता असूनही प्राध्यापकांची भरती होत नव्हती. विद्यापीठात एकूण मंजूर पदे २७२ आहेत. त्यातील १३८ पदे भरलेली असून, १२४ पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने मंजूर पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली असल्याने विद्यापीठातील ७२ प्राध्यापकांच्या रिक्त जागा नजीकच्या काळात भरल्या जाणार आहेत. विद्यापीठाने जरी याची प्रक्रिया सुरू केली असली, तरी रोस्टर तपासणीवरच अजून प्रक्रिया अडकली आहे. अन्य विद्यापीठांनी प्राध्यापक भरतीत गती घेतली असून, काही ठिकाणी निवड प्रक्रिया सुरू आहे. त्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेळ लागतो आहे. नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तरुण प्राध्यापकांची नियुक्ती लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. सध्या विद्यापीठातील सहा अधिविभाग असे आहेत, जेथे केवळ एकच प्राध्यापक आहेत. त्यांच्या खांद्यावरच अधिविभागाची जबाबदारी आहे.
-------------------
चौकट
प्रशासन प्रभारींच्या खांद्यावर
विद्यापीठाच्या प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे बऱ्याच विभागांचा कार्यभार प्रभारींच्या खांद्यावर आहे. विद्यापीठातील कोणतीही पदे भरायची असतील तरी त्यात अनेक अडचणी निर्माण होतात. कारण काही ठिकाणी हेव्यादाव्यांचे राजकारण केले जाते. मात्र, याचा प्रतिकूल परिणाम विद्यापीठाच्या कामकाजावर होतो.
---------------
प्रशासनातील रिक्त पदे
- कुलसचिव- १
- सहायक कुलसचिव- ६
- उपकुलसचिव- ३
- वित्त व लेखा अधिकारी- १
- अधीक्षक- ७
- कनिष्ठ लिपिक- ८०
- स्टेनोग्राफर- ३
------------------
कुलसचिव आणि वित्त व लेखा अधिकारी ही पदे एक वर्षापासून रिक्त आहेत. यावरून याबाबतचे गांभीर्य किती आहे, हे लक्षात येते. रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढतो. सर्वच गोष्टींना दिरंगाई होते. याचा परिणाम विद्यापीठाच्या प्रतिमेवर होतो. त्यामुळे विद्यापीठातील रिक्त पदे तातडीने भरावीत.
- वसंत मगदूम, अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघटना