तीन अपघातात दोघे ठार, एक गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन अपघातात दोघे ठार, एक गंभीर
तीन अपघातात दोघे ठार, एक गंभीर

तीन अपघातात दोघे ठार, एक गंभीर

sakal_logo
By

फोटो
72370 - अनुराधा पोतदार
72371 - लक्ष्मण डोईफोडे
72373
कोल्हापूर ः फुलेवाडी रिंगरोडवर शनिवारी झालेल्या अपघातातील दुचाकी.

फुलेवाडीच्या महिलेसह
शाळकरी मुलगा ठार
शहर परिसरात तीन वेगवेगळे अपघात, तरुण जखमी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः शहर परिसरात आज दिवसभरात झालेल्या तीन वेगवगेळ्या अपघातात महिलेसह शाळकरी मुलगा ठार झाला, तर रत्नागिरीतील तरुण गंभीर जखमी झाला. रंकाळा, फुलेवाडी रिंगरोड आणि केर्ली येथे अपघात झाले. जुना राजवाडा आणि करवीर पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. मृतांच्या नातेवाइकांनी सीपीआरमध्ये आक्रोश केला.
अपघातांबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः फुलेवाडी येथील दाम्पत्य सकाळी दुचाकीवरून नोकरीसाठी शहरात येत होते. त्याचवेळी रंकाळा तलाव परिसरात जेसीबी रस्त्यावरून जात होता. त्याचे बकेट दुचाकीला धडकले. यामुळे दुचाकीवरील अनुराधा मिलिंद पोतदार (वय ४६, रा. फुलेवाडी पाचवा बस स्टॉप) जागीच ठार झाल्या. त्यांचे पती मिलिंद जखमी झाले. अनुराधा लक्ष्मीपुरीतील खासगी रुग्णालयात नोकरी करीत होत्या. त्यांना सोडून पती मिलिंद उद्यमनगरात नोकरीसाठी जाणार होते. अपघातानंतर सीपीआर परिसरात गर्दी झाली होती. अनुराधा यांच्या मागे पती, मुलगा असा परिवार आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

घराचे बांधकाम असल्यामुळे कामगारांना चहासाठी दूध आणण्यासाठी जाताना दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक बसल्यामुळे शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. लक्ष्मण धुळू डोईफोडे (वय १४, रा. श्रीकृष्ण कॉलनी फुलेवाडी) असे त्याचे नाव आहे. फुलेवाडी रिंगरोडवर गंधर्वनगरी कमानीजवळ दुपारी चारला अपघात झाला. लक्ष्मण हा मीनाताई ठाकरे विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. त्याचे वडील मजुरीचे काम करतात. बांधकामावरील कामगारांना चहा करण्यासाठी दूध घेऊन येतो, असे सांगून तो गेला होता. दुसऱ्या दुचाकीशी धडक बसल्यामुळे अपघात झाला. अपघातात तो दूरवर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या मागे आई, वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे. डोईफोडे कुटुंबीय मूळचे राधानगरी तालुक्यातील एैनी गावाचे असून, गेली २० वर्षे फुलेवाडीत राहतात. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.

कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर केर्ली येथे दुचाकीचा अपघात होऊन यात नीलेश दामोदर माने (वय ३७ रा. शांतिनगर नाचणे, जि. रत्नागिरी) तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास अपघात झाला. शिराळा (जि. सांगली) येथून मोटारीतून आलेले पर्यटक पन्हाळा येथून कोल्हापुरात येत होते, तर नीलेश कोल्हापुरातून रत्नागिरीला दुचाकीवरून जात होता. दोन्ही वाहनांत जोराची धडक बसली. यामध्ये मोटारीचा टायर फुटला, तर दुचाकीचा चक्काचूर झाला. नीलेश बराचवेळ रस्त्यावर जखमी अवस्थेत पडून होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली, अखेर वाहनधारकांनी १०८ रुग्णवाहिकेला बोलावून त्याला उचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
-----------