
१
मत-मतांतरे
---------
लोकसंख्यावाढ ः एक गंभीर समस्या
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे लोकसंख्या नियंत्रण करणारी मोहीम उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस या देशाची लोकसंख्या वाढत आहे. सध्या भारताची लोकसंख्या १३५ कोटी आहे. काही वर्षांत देशाची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त केली जाते. तज्ज्ञांकडून अशा प्रकारचे भाकीत होत असतानाही सरकार याबाबत पूर्णतः उदासीन असल्याचे दिसून येते. पूर्वी लोकसंख्या नियंत्रणाबाबत आरोग्य विभागाकडून अनेक मोहिमा राबविल्या जात होत्या. संतती नियंत्रणाबाबत प्रबोधन केले जात होते. आशा वर्कर्स, आरोग्यसेवक यांच्याकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात होते. परंतु, आता असे प्रयत्न केले जात नाहीत. संतती नियमनाबाबत कोणताही खास कार्यक्रम सद्यस्थितीत विभागाकडे नाही. सरकार याबाबत गंभीर नाही. ही स्थिती अशीच कायम राहिली तर या देशाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तेव्हा लागलीच केंद्र सरकार व राज्य शासनाने गंभीर होण्याची गरज आहे.
शाम तळोकर, इस्लामपूर (जि. सांगली)
एकविसाव्या शतकात बळीचा प्रयोग
भारतात सध्या संगणक युग सुरू असून, देशातील खेड्यापाड्यातही मोबाईल व डिजिटल व्यवहार सुरू आहेत. लोक सुशिक्षित झाले असून, अंधश्रद्धेचे प्रमाण कमी झाले आहे. तरी अजूनही भूतप्रेत, करणी, बळी असे प्रकार देशाच्या विविध भागांत घडताना दिसतात. असाच प्रयोग यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडताना निदर्शनास आला. गुप्तधनासाठी पोटच्या मुलीचा बळी देण्याचे कटकारस्थान वडिलांनी आखले होते. पण, पीडित मुलीने योग्यवेळी पोलिसांना कळविल्याने या घटनेतील मांत्रिक व नराधम वडिलांना अटक करून तुरुंगात पाठविले. अशा तऱ्हेच्या घटना देशात अजूनही होत असून, यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालयांतून अशा तऱ्हेच्या अंधश्रद्धांवर चित्रफिती दाखवून, व्याख्यान ठेवून तरुण वर्गात जागृती करण्याची गरज आहे. कष्ट करून पैसे मिळविणे हे लोकांच्या मनावर बिंबवणे सध्याच्या काळाची गरज आहे. त्या दृष्टीने सरकारने व सामाजिक संस्थांनी प्रयत्न करावेत.
पी. एस. कुलकर्णी, कोल्हापूर
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53049 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..