
पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी गावेही सरसावली
फोटो ः
18024
पाडळी खुर्द ः येथे ग्रामस्थांनी खोदलेले शोषखड्डे.
18025
पाडळी खुर्द ः येथील ग्रामस्थांनी आता पुढाकार घेत शोषखड्डे खोदले आहेत.
जिल्हा परिषदेतून...(चला पंचगंगा वाचवूया)
पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी गावेही सरसावली
पारंपरिकसह आधुनिक उपायांचा अंमल इतरांसाठीही ठरतोय मार्गदर्शक
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी शहरात ज्याप्रमाणे एसटीपी उभे करणे, नाल्यावर बंधारे बांधून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे; त्याच पद्धतीने नदीकाठच्या काही गावांनीही सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत तर काही गावांनी आधुनिक तंत्राचा वापर सुरू केला आहे. गावांकडून सुरू असलेल्या या प्रयत्नांना नक्कीच दाद द्यायला हवी. पावसाळ्यात नदी, ओढे दुथडी भरून वाहत असल्याने त्यातील काही प्रकल्पांना मर्यादा आहेत. यातील दोष बाजूला करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. असे झाल्यास हे प्रकल्प इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात.
पंचगंगा नदीचे प्रदूषण कळीचा मुद्दा बनला आहे. शासनाकडून कारवाईचे आदेश आले, की तात्पुरत्या उपाययोजना करायच्या व नंतर मागील पानावरून पुढे..अशी परिस्थिती आहे; मात्र या सर्वांना नदीकाठावरील काही गावे अपवाद आहेत. उपलब्ध निधी, तंत्रज्ञान, श्रमदान यांचा मेळ घालत ही गावे आपल्यापरीने नदीचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंचगंगा नदी काठावर १७१ गावे आहेत. यातील थेट प्रदूषण करणाऱ्या गावांची संख्या ३८ आहे. यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत गावांकडून नदी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
बाजार भोगावमध्ये फिल्टर
पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव गावाने गावातील सांडपाणी एकत्रित करून त्यावर प्राथमिक प्रक्रिया केली आहे. विविध टॅँकमधून सांडपाणी फिल्टर करत ते शेतीस वापरण्यायोग्य केले आहे. या प्रकल्पाला आणखी तांत्रिक मार्गदर्शन मिळाले, तर त्याचा चांगला उपयोग होणार आहे. पावसाळ्यात हा प्रकल्प सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत. हा प्रकल्प नियमितपणे राबवण्यासाठी तांत्रिक व आर्थिक मदतीची गरज आहे.
पाडळी खुर्दला नांदेड पॅटर्न
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्दने तर नांदेड पॅटर्न राबवत वैयक्तिक शोषखड्ड्यांची निर्मिती केली आहे. त्यामुळे घरातून निघणारे सांडपाणी ओढ्या, नाल्यांतून नदीत न जाता ते जमिनीतच मुरवले जात आहे. हे मुरवत असताना ते खडी, वाळू, मातीच्या माध्यमातून जास्तीत जास्त फिल्टर करण्याचा प्रयत्न केला आहे.
नांदणी, वडणगे, पेंढाखळेत साखळी बंधारे
शिरोळ तालुक्यातील नांदणी, करवीर तालुक्यातील वडणगे, शाहूवाडी तालुक्यातील पेंढाखळे या गावांनी ओढ्यावर साखळी बंधारे घातले आहेत. त्यामुळे सांडपाणी अडवले जाऊन नैसर्गिकरीत्या फिल्टर होऊन हे पाणी पुढे पाठवले जाते. कोणत्याही खर्चाशिवाय श्रमदानातून पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रामस्थांकडून अशा प्रकारे नियमित बंधारे घालण्यात येत आहेत.
घोटवडे, आळवेत मोठा शोषखड्डा
राधानगरी येथील घोटवडे व पन्हाळा तालुक्यातील आळवे गावच्या ग्रामस्थांनी गावातील सांडपाणी एका मोठ्या शोषखड्ड्यात एकत्र केले आहे. या सांडपाण्याचा वापर शेतीसाठी केला आहे.
आता गरज तंत्र अन् अर्थसहाय्याची
राधानगरी तालुक्यातील राशिवडेच्या ग्रामस्थांनी सांडपाणी नाल्यावर आळू लागवड करून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. राधानगरीतील कोते, कौलव, शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी गावांनीही वनराई बंधारे, शोषखड्ड्यांद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी गावेही आता मागे राहिलेली नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली या गावांनीही प्रदूषणमुक्तीचा नारा दिला आहे. त्यांना आवश्यक तांत्रिक व आर्थिक सहाय्य मिळाल्यास ही गावे प्रदूषणमुक्तीसाठी चांगले काम करू शकतील.
पाडळी खुर्द गावाने नांदेड पॅटर्न राबवत वैयक्तिक शोषखड्ड्यांची निर्मिती केली आहे. गावात वैयक्तिक स्तरावर २६७ कुटुंबांनी शोषखड्ड्यात सांडपाणी सोडले आहे; मात्र एकाही शोषखड्ड्यातून सांडपाणी बाहेर आलेले नाही. अगदी महापुराच्या काळातही त्याचा काही त्रास झाला नाही. शोषखड्ड्यामुळे डासांची उत्पत्ती थांबली. हे काम करण्यास सुरुवातीला लोकांनी नकार दिला होता; मात्र त्याचा उपयोग ध्यानात आल्यानंतर शोषखड्ड्यांची मागणी वाढली आहे.
- स्वाती देशपांडे, ग्राम विकास अधिकारी, पाडळी खुर्द
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53074 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..