
कोल्हापूर : कस्तुरी सावेकरने केले ‘अन्नपूर्णा एक’ शिखर सर
कोल्हापूर - जगातील सर्वांत अवघड अष्टहजारी अन्नपूर्णा एक शिखर येथील गिर्यारोहक कस्तुरी सावेकरने सर केले. वीस वर्षे सात महिन्यांची असणारी कस्तुरी हे शिखर सर करणारी जगातील सर्वांत तरुण गिर्यारोहक ठरली आहे. आता ती दहा मेपासून माऊंट एव्हरेस्टवर चढाईसाठी सज्ज झाली आहे. एव्हरेस्ट मोहिमेसाठी तिला आर्थिक पाठबळाची गरज असल्याची माहिती तिचे वडील दीपक सावेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कस्तुरी २४ मार्चला माऊंट एव्हरेस्ट मोहिमेला रवाना झाली आहे. या मोहिमेतील सरावाचा भाग म्हणून कस्तुरीने जगातील चौदा अष्टहजारी शिखरांपैकी सर्वांत अवघड व खडतर असणाऱ्या दहाव्या क्रमांकाचे शिखर माऊंट अन्नपूर्णा एक (उंची २६,५४५ फूट) निवडले आणि ते यशस्वीरित्या सर केले. हे शिखर खडतर एवढ्याचसाठी की, माऊंट एव्हरेस्टचा डेथ रेट चौदा टक्के आहे, तर माऊंट अन्नपूर्णाचा डेथ रेट ३४ टक्के आहे. माऊंट एव्हरेस्टवर आतापर्यंत हजारो गिर्यारोहकांनी यशस्वी चढाया केल्या आहेत; पण अन्नपूर्णावर आतापर्यंत फक्त साडेतीनशे गिर्यारोहकच यशस्वी चढाई करू शकले आहेत. याचे कारण ते उंच, अत्यंत दुर्गम, चढाईसाठी अतिशय अवघड समजले जाते.
कस्तुरीचे अन्नपूर्णा समिट १९ एप्रिलला होणार होते. त्याप्रमाणे त्यांनी १६ एप्रिलला चढाई सुरू केली. कॅम्प दोनवर वातावरण खराब झाले. प्रचंड स्नो फॉल व वेगाने वाहणारे वारे यामुळे त्यांना परत बेस कॅम्पला यावे लागले. कस्तुरी २४ एप्रिलला बेस कॅम्प (उंची १३५० फूट) वरून पुन्हा निघाली. बेस कॅम्प ते कॅम्प एकच्या वाटेवर असणारे हॅंगिंग ग्लेशियर, कॅम्प एक ते कॅम्प दोनच्या मार्गावरील कडे, आईस वॉल पार करत ती सायंकाळी कॅम्प दोनपर्यंत पोचली. कस्तुरी कॅम्प दोनवरून २५ एप्रिलला निघाली. कॅम्प दोन ते कॅम्प तीन दरम्यान सतत होणारे रॉक फॉल व ॲव्हलॉंच अर्थात हिमपात यामुळे चढाई मार्ग बर्फाखाली गाडला जाऊ शकतो आणि गिर्यारोहक वाट हरवू शकतात. अशा आव्हानांचा सामना करत कस्तुरी कॅम्प तीनला तारीख २६ ला, तर २७ एप्रिलला दुपारी कॅम्प चारला पोचली. सायंकाळपर्यंत थांबून रात्री साडेआठला तिने अंतिम चढाईला प्रारंभ केला. संपूर्ण रात्र चालून २८ एप्रिलला दुपारी साडेबाराला तिने शिखर माथा गाठला. तेथे भारताचा तिरंगा ध्वज व भगवा ध्वज फडकवून लगेच सायंकाळी कॅम्प तीनवर इतर गिर्यारोहकांसोबत पोचली आणि काल ती परत बेस कॅम्पला पोचली. दहा मेपासून आता ती चांगली वेदर विंडो पाहून एव्हरेस्टच्या अंतिम चढाईला प्रारंभ करण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी संपर्क (दीपक सावेकर ः ९८२२६८१००५).
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54046 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..