
आयजीएम कर्मचारी निवासस्थान दूरवस्था
18690
18691
आयजीएम कर्मचारी सदनिकांची दुरवस्था
दोन वर्षांपूर्वी निधी मंजूर; नूतनीकरण रखडले; धोका वाढल्याने चिंता
संदीप जगताप ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २ ः आयजीएम रुग्णालयास मंजूर झालेल्या १८ कोटी २७ लाख निधीमधून रुग्णालय इमारत दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे आयजीएम रुग्णालय नवा लूक परिधान करीत आहे. मात्र, दुसरीकडे रुग्णालय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सदनिका दुरुस्तीसाठी चार कोटी ९२ लाख मंजूर असतानाही या इमारती दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या सदनिकांची अवस्था खराब असून इमारतीचे ढपले निघत आहेत. ड्रेनेज, पाईपलाईन, विद्युतवाहिन्या यांची अवस्था बिकट आहे. त्यांना तत्काळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने येथे वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून त्यांना सुरक्षित निवाऱ्याची आवश्यकता भासत आहे.
इचलकरंजी शहरातील नागरिकांची लाईफलाईन असलेले आयजीएम रुग्णालय २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासनाकडे हस्तांतरीत झाले. मात्र, हस्तांतरानंतरही अनेक वर्षे रुग्णालय दुरवस्थेतच होते. त्यानंतर मार्च २०२० मध्ये रुग्णालय इमारत व सदनिका दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला होता. यामध्ये सदनिकांसाठी चार कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर केला होता. मात्र, वेळकाढू धोरणामुळे या सदनिकांकडे दुर्लक्ष होत गेले. सध्या या सदनिका पाडून नव्याने बांधाव्या लागणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. शासनाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर २०१७ व २०१९ मध्ये एजन्सीमार्फत स्ट्रक्चलर ऑडिट केले होते. यामध्येही इमारतींची अवस्था खराब झाली असल्याचा अहवाल दिला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालय प्रशासनाकडून दुरुस्तीऐवजी नव्या इमारती बांधण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी जागेचा सात-बारा, नकाशा मागवला आहे. मात्र, अद्याप रुग्णालय प्रशासनाने ते पाठवले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सदनिकांच्या बांधकामासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इचलकरंजी नगरपालिकेने शहारच्या मध्यवस्तीत १९८७-८९ मध्ये आयजीएम रुग्णालयाची उभारणी केली होती. रुग्णालयाच्या लगतच सदनिका उभी केल्याने रुग्णांना जलद सेवा देणे सोयीस्कर होत होते. या सदनिका प्रत्येकी तीन मजली असून, अशा चार इमारती बांधण्यात आल्या आहेत. यातील एका इमारतीमध्ये १२ कुटुंबे अशी एकूण ३८ कुटुंबे राहतील इतक्या क्षमतेच्या आहेत. मात्र, पालिकेने इमारतींच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने त्या आज धोकादायक स्थितीमध्ये उभ्या आहेत.
--
घाणीच्या साम्राज्याचा विळखा
इमारतीच्या संरक्षणासाठी बांधलेल्या दगडी भिंतीही पूर्णपणे ढासळलेल्या आहेत. तसेच इमारतीच्या अनेक भागांमध्ये उगवलेले गवत, साफसफाईचा अभाव यामुळे कचरा साचलेला असतो. परिणामी, सदनिकांच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून रोगराई वाढत असून, काही दिवसांपूर्वी आलेल्या डेंग्यूच्या साथीमध्ये येथील रुग्णांची संख्या अधिक होती. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54226 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..