
पारंपारिक उत्साहात रमजान ईद
19090
गडहिंग्लज : वडरगे मार्गावरील ईदगाह मैदानावर नमाज पठाण करताना मुस्लिम बांधव. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
पारंपरिक उत्साहात रमजान ईद
गरजूंना मदत; विश्वशांतीसाठी प्रार्थना, मिठाई वाटप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : गेला महिनाभर सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्याचा समारोप आज ईदने करण्यात आला. गेली दोन वर्षे घोंगावणाऱ्या कोरोना संकटाला दूर सारत पारंपरिक उत्साहात रमजान ईद शहर परिसरासह तालुक्यात साजरी करण्यात आली. ईद निमित्त जकातच्या माध्यमातून गरजूंना मदत देण्यात आली. सकाळी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणात विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. दिवसभर शुभेच्छांची देवाणघेवाण करत घरोघरी शीरखुर्म्याचे मित्र मंडळी, नातेवाईकांना वाटप करण्यात आले.
रमजान ईदची तयारी गेला आठवडाभर सुरू होती. काल (ता. २) रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसली. खासकरून गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे उत्साहाला लगाम घालून औपचारिकरित्या साध्या पध्दतीने ईद साजरी झाली होती. त्यामुळेच यंदा दिवसभर ईदचा उत्साह ओसंडून वाहिला. सकाळी साडेआठ वाजताच ईदगाह मैदान मुस्लिम बांधवांनी फुलून गेले. मौलाना मेहमूद रजा यांनी खुतबापठण केले. पालिका, पोलिस विभाग यांनी केलेल्या सहकार्याबद्दल या वेळी आभार मानण्यात आले. उपस्थितांनी गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही गडहिंग्लजकरतर्फे ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे, संदीप कुराडे यांच्यातर्फे मिठाईचे वाटप करण्यात आले. पोलिस दलाने फुले देऊन शुभेच्छा दिल्या. शहरासह तालुक्यातील महागाव, कडगाव, हलकर्णी, नूल, नेसरी परिसरातही ईद उत्साहात साजरी झाली.
---------------
चौकट..
महात्मा बसवेश्वरांना अभिवादन
आज ईद दिवशीच महात्मा बसवेश्वरांची जयंती होती. येथील वीरशैव बँकेलगत असणाऱ्या बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मुस्लिम समाजातर्फे अभिवादन करण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54677 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..