
पर्यटन
19238
देशांतर्गत पर्यटन आले बहरात
---
दोन महिन्यांत साडेपाच हजारांनी केले पर्यटन; विमान भाडे वाढले तरीही पसंती
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः उन्हाळी सुटीचा हंगाम तेजीत असताना पुन्हा कोरोना संकटाचे ढग दाटत आहेत. असे असले तरी सुटीतील सहलीचा आनंद घेण्यात पर्यटकांचा उत्साह आहे.
कोरोनामुळे परदेशी सहलीचा जोर ओसरला असला, तरीही देशांतर्गत पर्यटनात वाढ झाली. त्यानुसार दोन महिन्यांत जवळपास साडेपाच हजारांवर पर्यटक उत्तर व दक्षिण भारतात पर्यटनाला गेले आहेत. परिणामी, विमान प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाली. काश्मीर, हिमाचल प्रदेश, छत्तीसगडसह भुतान अशा उत्तर भारतीय पर्वतरांगांबरोबर दक्षिणेकडील केरळ समुद्र किनारपट्टी व जंगली पर्यटनाला कोल्हापुरातील हजारो पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पर्यटन क्षेत्रात पुन्हा तेजीत आल्याने कोट्यवधीची उलाढाल होत आहे.
गेल्या वर्षी काही महिने कोरोना संकट धुसर झाले; पण परदेशात जाण्यासाठी विमान सेवा पुरेशा प्रमाणात सुरू नव्हती. यंदा सुरुवातीला चार महिन्यांत कोरोना कमी झाला. केंद्र सरकारने कोरोना निर्बंध शिथील केले. तीन महिन्यांपासून लोक पर्यटनाला पुन्हा बाहेर पडू लागले. मात्र, अधूनमधून कुठे तरी कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याच्या बातम्या येत असल्याने अनेकांच्या मनात परदेशी सहलीला जाण्याबाबत साशंकता आहे. त्यासाठी टुर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांनी अनेक पर्यटकांना परदेशी जाण्याऐवजी भारतीय पर्यटन करण्याचा सल्ला देण्यास सुरुवात केली.
पुणे ते दिल्ली, गोवा ते दिल्ली, किंवा मुंबई ते दिल्ली असा विमान प्रवास जवळपास साडेतीन ते सहा हजार रुपयांत होत होता. त्यासाठी दोन महिने अगोदर बुकिंगही अनेकांनी केले.
गेल्या महिन्यापासून मात्र पर्यटकांची संख्या वाढली. विमानसेवेची तिकिटे काढताना दुप्पट दरात तिकिटे घेण्याची वेळ आली. सध्या सात ते १२ हजार रुपये देऊन काही पर्यटकांनी तिकिटे काढली आहेत.
देशातील विविध भागांत पर्यटनाचा आनंद कोल्हापूरचे पर्यटक घेत आहेत. दोन महिन्यांत बुकिंग चांगले झाले. हनिमुन कपल, कौटुंबिक पर्यटक तसेच ग्रुप टुर्स मोठ्या प्रमाणात निघाल्या आहेत. ऐनवेळी विमानाचे तिकीट काढताना जास्त किंमत मोजावी लागते. तशी तयारी अनेकांनी ठेवली. टुर्स कंपन्यांनी चांगल्या हॉटेलमध्ये निवास, जेवणाची सुविधा चांगली दिली आहे. त्यामुळे पर्यटकांचा उत्साह वाढत आहे.
- रवींद्र पोतदार, गिरिकंद टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54680 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..