
महा ताल उत्सव
१९१२७, १२८,१३०
खासबाग मैदानावर उद्यापासून लोकवाद्यांचा उत्सव
राकेश चौरसिया, मामेखान, सिवामणींसह तौफिक कुरेशींचा कलाविष्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीवर्षानिमित्त गुरुवार (ता. ५) पासून राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे महाताल उत्सव रंगणार आहे. ऐतिहासिक खासबाग मैदानावर सलग तीन दिवस रंगणाऱ्या या उत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकारांचा कलाविष्कार होणार आहे. सायंकाळी पाचनंतर या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. दरम्यान, तीन दिवस सव्वाशेहून अधिक दुर्मिळ वाद्यांचे प्रदर्शन याच ठिकाणी भरणार आहे. याबाबतची माहिती आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे.
गुरुवारी (ता. ५) सायंकाळी पाच ते सहा या वेळेत ‘गजर लोकवाद्यांचा’ हा दोनशेहून अधिक लोकवाद्य कलाकारांचा कार्यक्रम होईल. त्यानंतर मामेखान पॉक्स अँड रूटस् तर साडेसातनंतर राकेश चौरसिया आणि कलाकारांचा कलाविष्कार सादर होईल. शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी पाचला दोनशेहून अधिक संबळ व हालगी वादकांचा कलाविष्कार, त्यानंतर फोल्क्सवॅगन बॅंड आणि साडेसातनंतर सिवामणी ट्रायो यांचा कलाविष्कार होईल. शनिवारी (ता. ७) सायंकाळी पाचला चौंडक आणि ढोलवादन, त्यानंतर विजय चव्हाण यांचा ‘फोक ड्रम ऑफ महाराष्ट्र’ कार्यक्रम तर साडेसातनंतर उस्ताद तौफिक कुरेशी आणि कलाकारांचा ‘कलर्स ऑफ रिदम’ हा कलाविष्कार सादर होईल.
जतन व संवर्धनासाठी उत्सव
महाराष्ट्रातील लोकवाद्यांच्या नामशेष होणाऱ्या, लोप पावत असलेल्या वाद्यांचे जतन व संवर्धन व्हावे, विशिष्ट आधुनिक तंत्रज्ञान वापरून वाद्ये कशी वाजतात, याचा अनुभव प्रेक्षकांना देणे, वाद्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके देणे, वाद्यविषयक माहिती प्रदर्शित करणे अशा वाद्यांचा महोत्सव साजरा करणे आदी कार्यक्रमांवर सांस्कृतिक कार्य विभागाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उत्सव रंगणार आहे. तारपा, मोहरीपावा, घांगळी, घुमळ, कासाळे, संबळ, ढोलकी, मृदंग, पुंगी, सनई, तुणतुणे, पावा, घुंगरू, जोगिया सारंगी, खुळखुळा, चिमटा, मसक, सातारा, एकतारी, पिपाणी, नगारा, चिपळ्या, मटके, मुरसिंग, उमरू, दुदुंभी, खंजिर, शहनाई, सुंदरी, शिंग, तुतारी, कर्णा, सारिंदा, पेना, नंदुणी, मुरसिंगार, विचिमविणा, गोपीचंद, संबाला, सुरसोटा, घंटा, उहाळा, दिमडी, मादळ, डेरा, थाळी, तडफा, पेपुडी अशा कितीतरी वाद्यांचा या मेळाव्यामध्ये समावेश असणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54709 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..