
खवय्यांची स्थानिक आंब्यावरच भिस्त
खवय्यांची स्थानिक
आंब्यावरच भिस्त
हापूस अद्याप नाहीच; कोकणातील आवक जेमतेम
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : फळांचा राजा आंब्याचे आगमन होऊन दोन महिने उलटले; पण कोकणातील आवक जेमतेमच असल्याने दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. डझनाचा ६०० ते १००० रुपयांच्या दरामुळे यंदा कोकणचा हापूस अद्याप ग्राहकांसाठी आंबटच आहे. साहजिकच खवय्यांची पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या स्थानिक आंब्यावरच भिस्त आहे.
दरवर्षी मार्च महिन्यात आंब्याचा हंगाम सुरू होतो. सुरुवातीला कोकणातील आंब्याची आवक असते. प्रारंभी आवक कमी असल्याने दर जास्तच असतात; पण जशी आवक वाढेल, तसे महिन्याभरानंतर दर आटोक्यात येतात. या पारंपरिक व्यवहार चक्राला यंदा प्रथमच ब्रेक लागला आहे. सुरुवातीला पंधराशे ते १८०० रुपये असणारा चांगल्या प्रतीचा आंब्याचा दर दोन महिन्यांनंतरही हजारच्या खाली उतरला नाही.
त्यातच गेले पंधरा दिवस सर्वत्र वळीव पावसाच्या माऱ्याने तयार आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचाही आवकेवर परिणाम झाल्याचे विक्रेते सांगतात. त्यामुळेच स्थानिक आंब्यांच्या आवकेकडे खवय्यांच्या आशा लागून राहिल्या आहेत. दरवर्षी मे महिन्यात ही आवक सुरू होते. हंगामात दररोज सुमारे ५००-७०० डझन आंबे फस्त होतात. अलीकडे कोकणातून थेट आंबा उत्पादकही विक्रीस येत आहेत. रोज सुमारे चार लाख रुपयांची उलाढाल होते.
------------------
चौकट
आंब्याचा बाजार
- हंगाम तीन महिने
- रोज ५०० ते ७०० डझन विक्री
- घाऊक २५, तर किरकोळ १२५ विक्रेते
- उलाढाल रोज चार लाख रुपये
- कोकणसह कर्नाटकातून आवक
------------------
कोट...
गेले दोन हंगाम कोरोनामुळे कोकणातील हापूस आंब्याची निर्यात खूपच कमी झाली. साहजिकच त्यामुळे स्थानिक फळबाजारात अधिक आवक झाल्याने दर परवडणारे होते. यंदा निर्यातीमुळे आवक कमी झाल्याने दर अधिक आहेत.
- गजानन कांबळे, फळ विक्रेता, गडहिंग्लज
-----------------
कोकणातील आंब्याचे दर उतरतील म्हणून गेला महिनाभर प्रतीक्षा करतोय. पण, दर चढेच राहिल्याने ग्राहक मिळणार नाहीत म्हणून अद्याप आंब्याची खरेदी-विक्रीच सुरू केलेली नाही. पुढील महिन्यात दर उतरण्याची आशा आहे.
- सलीम देसाई, फळ विक्रेता, गडहिंग्लज
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54763 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..