गोकुळ राजकारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ राजकारण
गोकुळ राजकारण

गोकुळ राजकारण

sakal_logo
By

‘स्वीकृत’वरून ‘महाविकास’मध्ये नाराजी
‘गोकुळ’चे राजकारण; सत्तांतरासाठी झटलेल्या निष्ठावंतांचा भ्रमनिरास
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः गोकुळ स्वीकृत संचालक पदाच्या निवडीवरून महाविकास आघाडीतच नाराजीचे वातावरण आहे. ‘गोकुळ’च्या सत्तांतरासाठी झटलेल्यांना डावलून झालेल्या या निवडीमुळे नेत्यांशी एकनिष्ठ राहिलेल्यांचा भ्रमनिरास झाला आहे. निवडीचे पडसाद आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्‍वाखालील पॅनेलने सत्तांतर घडवले. तथापि या सत्तांतराची मोर्चेंबांधणी पाच वर्षांपासूनच सुरू झाली होती. त्याला निमित्त ठरले होते ते ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय. ‘मल्टिस्टेट’चा निर्णय सत्ताधाऱ्यांनी मागे घेतला; पण त्याचे पडसाद पुढे निवडणूक होईपर्यंत उमटत राहिले. आताच्या सत्ताधाऱ्यांनी या विरोधातील लढा कायम ठेवला, त्यात सर्वपक्षीय तळागाळातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण तयार झाल्याची जाणीव होताच पाच विद्यमान संचालकही विरोधकांना मिळाले, त्यामुळे त्यांच्या लढ्याला आणखी बळ मिळाले.
संघाची निवडणूक लागली आणि ‘मल्टिस्टेट’ विरोधात रान उठवलेल्या कार्यकर्त्यांना पॅनेलमध्ये संधी मिळेल असे वाटत होते. तथापि बयाजी शेळके, बाबासाहेब चौगले असे अपवाद वगळता नेत्यांनी वारसदारांनाच उमेदवारी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी एकत्रित महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढली गेली. त्यातून सत्तांतर झाले; पण चार जागांवर आताच्या सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला. जे पराभूत झाले त्यांना स्वीकृत्त म्हणून संधी दिली जाण्याची चर्चा सुरू झाली, त्यातून खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांचे नांव निश्‍चित होते; पण त्यांनी फेसबुकवरून थेट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरच निशाणा साधला. इकडे आरोप-प्रत्यारोप आणि ‘स्वीकृत’ची जुळवाजुळव सुरू असतानाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडून शासन नियुक्त संचालक पदावर नियुक्तीचे आदेश आणून नेत्यांची पंचाईत केली. त्यांना आजअखेर संघात अधिकृत मान्यता दिली नव्हती, यामागे त्यांची नियुक्ती रद्द करून शिवसेनेच्या अन्य कोणाला तरी संधी देण्याची चाल होती. त्यामुळे ही जागा शिवसेनेला व उर्वरित दोन जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीला संधी देण्याचे ठरले.
राष्ट्रवादीकडूनही एखाद्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल असे वाटत असतानाच कागलच्या राजकारणात मुश्रीफ यांच्यासोबत असलेल्या युवराज पाटील यांना संधी दिल्याने इतर कार्यकर्ते नाराज आहेत. युवराज पाटील व भैय्या माने यांच्याशिवाय कागलमध्ये कोण निष्ठावंत नाही का, असा प्रश्‍न यातून निर्माण होत आहे. या पदावर चंदगड तालुक्यातील महाबळेश्‍वर चौगले यांना संधी द्यावी म्हणून आमदार राजेश पाटील व त्यांच्या समर्थकांनी नेत्यांची भेट घेतली; पण त्यांना नेत्यांनी धुडकावून लावल्याचे समजते. आमदार पाटील यांच्या पत्नी पराभूत झाल्या तर चंदगड, आजरा, गडहिंग्लजमध्ये ‘गोकुळ’चा संचालक नसल्याने ही मागणी केली होती; पण त्याला नकार देऊन युवराज पाटील यांच्या नियुक्तीमुळे नाराजी आहे. विजयसिंह मोरे हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते; पण त्यांनाही डावलल्याने ते काही दिवस नाराज होते. त्यांना ‘स्वीकृत’चा शब्द देऊन पुन्हा सक्रिय केले. आज त्यांची झालेली निवड ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असला तरी नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काही कार्यकर्ते सत्तांतरासाठी झटले, त्यांच्यावर मात्र या निवडीत अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे.

जिल्हा बँकेचे पडसाद
राज्यात महाविकास आघाडी असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदार मंडलिक यांनी स्वतंत्र पॅनेल केले. या पॅनेलचे तीन उमदेवार विजयी झाले तर सत्तारूढ गटाचे नवखे उमेदवार पराभूत झाले. ‘गोकुळ’च्या स्वीकृत संचालक पदाच्या निवडीत हे राजकारणही कारणीभूत ठरले, त्यामुळेच आमदार राजेश पाटील यांनी सुचवलेल्या उमेदवाराला डावलण्यात आल्याची चर्चा आहे. त्याचे पडसाद जिल्हा परिषद, पंचायत समिती व आगामी विधानसभेतही उमटण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54771 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top