
राष्ट्रीयकृत बॅंकाप्रमाणे पतसंस्थांतून योजना राबविणार : प्रकाश आबिटकर
19185
आजरा ः कॅश्यू मॅन्युफॅक्चरस्च्या कार्यालयाचे उद्घाटन करताना आमदार प्रकाश आबिटकर, मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, डॉ. अनिल देशपांडे, जनार्दन टोपले, प्रकाश कोंडुसकर, महादेव पोवार आदी.
राष्ट्रीयीकृत बॅंकाप्रमाणे पतसंस्थांतून
योजना राबविणार : प्रकाश आबिटकर
‘आजऱ्यात कॅश्यू मॅन्युफॅक्चरस्’च्या कार्यालयाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ४ : राष्ट्रीयीकृत बॅंकांतर्फे विविध शासकीय योजना राबविल्या जातात. याच धर्तीवर पतसंस्था व स्थानिक बॅंकाकडून या योजना राबविण्याबाबतचे धोरण लवकरच अमलात आणले जाणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. आजरा येथे कॅश्यू मॅन्युफॅक्चरसच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार आबिटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी काजू असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कोंडुसकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, ‘‘स्थानिक पातळीवरील काजू प्रक्रिया उद्योगामध्ये उपलब्ध असणारा रोजगार व प्रत्यक्ष व अप्रत्यक्षेरीत्या होणारी सुमारे तीनशे कोटींची वार्षिक उलाढाल विचारात घेतल्यास या उद्योगातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी असोसिएशनची स्थापना केली आहे.’’ आमदार आबिटकर म्हणाले, ‘‘सध्याचे बॅंकाचे व्याजदर हे काजू प्रक्रिया उद्योजकांना परवडणारे निश्चितच नाहीत. यासाठी सहजपणे व्यावसायिकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक बॅंकानी व्याजदराबाबत सकारात्मक विचार करावा. सूत उद्योगासाठी ज्या पध्दतीने वीज बिलामध्ये सवलत दिली जाते. त्या पध्दतीने काजू व्यवसायासाठी सवलत मिळावी यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत. जीएसटी, वीज दर, अन्न व भेसळ परवाने, बाजार समित्यांकडून उत्पादकांना कोणतीही सेवा न देता आकारला जाणारा सेस अशा अनेक किचकट बाबी काजू प्रक्रिया उद्योगासमोर आहेत. या साठी काजू प्रक्रिया उद्योजकांची स्वतंत्र बैठक घेऊन मार्ग काढला जाईल. कोरोनामुळे आलेल्या अडचणींचा सर्वात मोठा फटका सर्फनाला प्रकल्पाला बसला आहे. निविधा, बजेट यासारख्या सर्व बाबी पूर्ण असूनही यावर्षी पाणी अडवता आले नाही. पुढील वर्षी या प्रकल्पात पाणीसाठा केला जाईल.’’ आजरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, जनता बॅंकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी आपआपल्या संस्थांमधून कमीत कमी व्याजदरात अर्थसाह्य करण्याची ग्वाही दिली. जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई, उद्योजिका वृषाली कोंडुसकर, मारुती मोरे, महादेव पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला आजरा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे, लक्ष्मण गुडुळकर, माजी उपसभापती दीपक देसाई, उतम देसाई, विकास फळणीकर, निशांत जोशी, परेश पोतदार, इंदजित देसाई, नेताजी कातकर, अनिल मोरे यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.
-----------
चौकट
औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी प्रयत्न
आजरा येथील लघुऔद्योगिक वसाहतीमध्ये चांगल्या पध्दतीने उद्योग सुरू आहेत. तालुकावाशीयांची या वसाहतीच्या विस्तारणाची मागणी योग्य असून, यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले, तर जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई यांनी वेळवट्टी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सध्याच्या वसाहतीशेजारी असणारी जागा देण्यासाठी ग्रामपंचायतीची तयारी असल्याचे स्पष्ट केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54787 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..