
राजकुमार कॉलेज
19216
राजर्षी शाहू महाराजांना
राजकोटमध्ये अभिवादन
राजकुमार कॉलेजमध्ये खासदार संभाजीराजेंची उपस्थिती
कोल्हापूर, ता. ३ ः राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण झालेल्या राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये उपस्थित राहून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अभिवादन केले. राज्यसभा सदस्यत्वाची कारकीर्द रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुरू केली होती. आज कार्यकाळाचा शेवटचा दिवस असताना या शाळेस भेट देऊन शाहू महाराजांना अभिवादन केल्याचे मनस्वी समाधान लाभल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त त्यांनी कॉलेज प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. त्यांना प्रतिसाद देत कॉलेजने महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून खासदार संभाजीराजे यांना निमंत्रित केले होते. कॉलेजच्या मुख्य असेम्ब्ली हॉलमध्ये कार्यक्रम झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव येथे संगमरवरी कोनशिलेवर कोरले आहे. तिथेच महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले.
राजर्षी शाहू छत्रपती महाराज ज्या शाळेत शिकले, त्या याच राजकुमार कॉलेजमध्ये खासदार संभाजीराजे शिकले आहेत. ज्या शाळेने घडवले, त्या शाळेला तब्बल ३३ वर्षांनंतर त्यांनी भेट दिली. कॉलेजचे मुख्य विश्वस्त ठाकूरसाहेब जितेंद्रसिंह मुली, ठाकूरसाहेब चैतन्यदेवसिंह वाधवान, ठाकूरसाहेब देवेंद्रसिंह विरपूर, युवराजसाहेब रणजितसिंह मुली यांच्यासह अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54814 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..