
होन प्रदर्शन
ऐतिहासिक सुवर्ण होन
शुक्रवारी पाहता येणार
जुना राजवाडा येथे भरणार प्रदर्शन
कोल्हापूर, ता. ३ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ‘शिवभक्ती’च्या पैलूला मानवंदना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला ऐतिहासिक सुवर्ण होन राजर्षी शाहू स्मृतिशताब्दीनिमित्त जुना राजवाडा येथील प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. हा होन जगभरातील शिवप्रेमींना पाहता यावा यासाठीच्या या उपक्रमाची सुरुवात होत आहे. शुक्रवारी (ता. ६) भवानी मंडप येथे एक दिवसासाठी तो प्रदर्शित केला जाणार असून, सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत तो पाहता येणार आहे.
याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शुक्रवारी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची स्मृतिशताब्दी आहे. त्यांच्या चरित्राचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेली नितांत आस्था. त्यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी स्वराज्याचे सुराज्य घडविण्याचा संकल्प केला होता. पन्हाळगड, जुना राजवाडा व नर्सरी बाग येथे शिवाजी महाराजांची स्मारक मंदिरे उभी केली. सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या ठशाची रूप्याची प्रतिकृती करून त्याची देवघरात प्रतिष्ठापना केली. रथोत्सव सुरू केला. शिवचरित्राच्या लेखनाला सढळ मदत केली. पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या अश्वारूढ मूर्ती व स्मारकाचा पाया रचला.
कित्येक वर्षांपासून रायगडावरील औकिरकर कुटुंबीयांच्या देवघरात असणारा सुवर्ण होन सुपूर्द केला. हा होन जगभरातील शिवप्रेमींना पाहता यावा असा मानस आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर तो पाहण्याकरिता खुला असेल.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54828 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..